मुंबई | मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा व वसतिगृह या व अशा अनेक विषयांतील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याचा विरोध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आज विद्यापिठाच्या कलिना संकुलात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अभाविपने विद्यापीठ प्रशासनापुढे पुढील मागण्या मांडल्या –
१. SYBCom च्या परिक्षेचे अचानक बदललेले वेळापत्रक पूर्ववत करावे.
२. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनात सुमारे ३५,००० विद्यार्थी पास झाले. यातील चूकांची सखोल चौकशी करावी.
३. उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे नाव लिहीण्याची अट रद्द करावी.
४. रत्नागिरीतील बोगस गुणपत्रिका प्रकरणातील अटक झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्याची चौकशी करून सर्वांवर कडक कारवाई करावी.
परिक्षा विभागातील या समस्यांसोबतच विद्यार्थी वसतीगृहांच्या समस्यांनीही ग्रस्त आहेत. विद्यार्थ्यांची या समस्यांपासून सुटका व्हावी यासाठी अभाविपने या आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या केल्या.
१. विद्यापीठाच्या वसतीगृहांचा दर्जा सुधारावा आणि क्षमता वाढवावी.
२. UMLA च्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करावी.
३. कर्मवीर भाऊराव पाटील वसतीगृहाचे नुतनीकरण गेली दोन वर्षे चालू आहे. अभाविपने वेळोवेळी याकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्वरीत या वसतीगृहाचे नुतनीकरण पूर्ण करावे.
४. नरीमन पाॅईंट येथील मादाम कामा या मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन होऊन वर्ष झाले तरी वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर हे वसतीगृह खुले करावे, अशी मागणी अभाविपने केली.
५. सर्व वसतीगृहांमध्ये अभ्यासिका व उपाहारगृहांची सोय असावी.
यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या डाॅ. अर्जुन घाटुळे यांनी SYBCom च्या परिक्षांच्या वेळापत्रकावर पुनर्विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. बोगस गुणपत्रिकांच्या प्रकरणात विद्यापीठ प्रशासन लक्ष घालत आहे, असेही त्यांनी सांगितले. उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनातील चुकांच्या बाबतीत येत्या दोन दिवसात निराकरण करू, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अभाविप मुंबई महानगर मंत्री अमेय महाडीक यांनी सांगितले की, आम्ही अनेक वेळा या समस्या घेऊन विद्यापीठ प्रशासनाकडे आलो परंतु त्यांच्या अनास्थेमुळे आज आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.