माझ्या तरुण मित्रा
आपला देश तरुणांचा देश म्हणून जगात सांबोधले जाते
आणि हे खरही आहे जर आपण वयाने प्रमाणित केलं
पण जर विचारांनी प्रमाणित केलं तर
आजही हा देश कित्येक पिढया मागे आहे
माझ्या तरुण मित्रा
इथे सतत बोललं जातं आपला देशाचा विकास तरुणांच्या हातात आहे
पण इथे प्रश्न उद्भवतो की आपण तितके सक्षम आहोत का?
जिथं पाश्चिमात्य देशाचा विकास त्यांच्या वैज्ञानीक आणि तर्कशुद्ध बुद्धीवर होतो
आपल्याकडे ती आहे का? प्रश्न हा ही पडतो
आपण आजही पूर्वजांपासून चालत आलेल्या माहीत नसलेल्या धर्माचं पालन करतो
ज्यात माणसाला माणूस म्हणून नाकारण्याचा धडा दिला जातो
ज्यात अंधश्रद्धेला सर्वोच्च स्थान दिल जात, ज्यात विज्ञानाला पाप समजलं जात, धर्माविरुद्ध मानलं जातं
आणि आपण ह्या वस्तुस्थितीला कधीच प्रश्न विचारत नाही
की आपण हे का करतो?
माझ्या तरुण मित्रा
आपल्या देशातील तरुणांना गती तर मिळाली आहे
आणि त्या गतीत ते अंध होऊन जगत आहेत
ते विसरले आहेत गतीसोबत योग्य दिशा असणं गरजेचं आहे
पण ते जगत आहे ह्या गतीलाच दिशा समजून दिशाहीन बनून
आणि जेव्हा गतीला योग्य दिशा नसते तेव्हा ती सर्व काही उध्वस्त करत जाते
माझ्या तरुण मित्रा
ह्या देशात जाती धर्माची मुळे इतक्या खोलवर रुतली आहेत
की आपली प्रत्येक कृती आपल्या जातीच आणि धर्माचं प्रतिनिधित्व करत आहे
इथे माणसे हिणवली जात आहेत
कत्तली केल्या जात आहेत
नग्न धिंड काढली जात आहे
सामूहिक बलात्कार देखील होत आहेत
जाती धर्माच्या आड हा बाजार खुले आम केला जातो
ह्यात माझ्या देशातला तरुण पुढाकार घेत असतो
पण आपण ज्यांच्यासोबत हे करतो तोही माणूस आहे ह्याची जाणीवच आपल्याला कोणी करून दिली नाही आपल्या जडणघडनाचया वेळी
माझ्या तरुण मित्रा
आज आपण खूप स्वातंत्र स्वातंत्र करत असतो
प्रत्येक गोष्टीच स्वातंत्र
विशेष करून स्त्री पुरुष समानता
आपण सहज बोलतो माझी जोडीदाराला, प्रेयसीला, बायकोला, घरातल्या स्त्रियांना आम्ही स्वातंत्र दिलंय हवं ते करण्याचं
इथं प्रश्न पडतो तुम्ही आम्ही कोण त्यांना स्वातंत्र देणारे
ती जन्मतः स्वतंत्र आहे
आपण सहज वावरत आहोत आणि बोलत आहोत स्त्री पुरुष समानतेबद्दल मनात मनुस्मृती चे विचार घेऊन
माझ्या तरुण मित्रा
ह्या देशातला तरुण खूप भावनिक आहे
तो जातो एखाद्या राजकीय पक्षात, कार्यकर्ता म्हणून
प्रामाणिकपणे कामही करतो,
पक्षासाठी लढतो, त्याची विचारधारा धर्माशी जोडली असल्याने
आपलं सर्वस्व पणाला लावतो,
तो उतरतो रस्तावर, दगडफेक करतो, दुकान जाळतो,
गाड्या फोडतो, माणसांना मारतो,
नाकाबंदी करतो, यंत्रनेलाही धमक्या देतो, जेरबंद होतो,
मग कोणी जय श्री राम बोलत तर कोणी जय भीम
आपल्या कट्टररतेच्या कृतीतून तो उध्वस्त करत असतो सगळं काही आणि स्वतःलाही
आणि हे राजकीय नेते घेत राहतात त्यांच्या तरुणाईतल्या सळसळत्या रक्ताचा फायदा आपली सत्ता टिकवण्यासाठी
त्यांना दिशाहीन बनवतात त्यांना हिंसक बनवतात
त्यांना गुलाम बनवतात त्यांना लालूच देतात व्यसनी बनवतात
त्यांना बुद्धीहीन बनवतात स्वतः राज्य करण्यासाठी
माझ्या तरुण मित्रा
हा माझा देश तरुणांचा देश
ज्यात तरुणच स्वतः धेक्यात आहे
त्यांचं भविष्य धोक्यात आहे
त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे
कारण कोनी जाती धर्माच्या लढाईत आहे
कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीत आहे
कोणी बेरोजगार आहे
कोणी अशिक्षित आहेत
कोणी सुशिक्षित अशिक्षित आहेत
कोणी अंधश्रद्धेला बळी जात आहे
कोणी देवाच्या मार्गावर आहे
कोणी बाबाच्या मार्गावर आहे
कोणी परंपरा जपण्याच्या मार्गावर आहे
कोणी अहंकार बाळगत आहे
माझ्या तरुण मित्रा पण कोणी एक साधारण माणूस म्हणून जगत नाही आहे
माझ्या तरुण मित्रा
आतातरी जागा हो
तू विज्ञानाला स्वीकार
अंधश्रद्धेला नाहीस कर
जाती धर्माला नाकारून समता आणि माणुसकीला आपलंसं कर
तू प्रत्येक कृतीला प्रश्न विचार, ती तुला जिज्ञासू बनवेल
तू विवेकशील हो बुद्धिवंत हो
तू शांतीप्रिय हो
माझ्या तरुण मित्रा
मग म्हणता येईल माझा देश तरुणांचा देश आहे
आणि त्याचा विकास हा तरुणच करणार आहे
नामदेव येडगे