कल्याण शुन्य कचरा संकलन मोहीमेच्या माध्यमातून महिन्यातुन एकदा अनुक्रमे कल्याण आणि डोंबिवली शहरांतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे असलेले जुने साहित्य संकलित केले जाते. जुने कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य, बॅग, इलेक्ट्रॉनिक वस्तु, प्लास्टिक, चपला आणि बूट मोठ्या प्रमाणात या मोहिमेत जमा होत असतात. जमलेल्या साहित्याची वयोगट आणि आकारानुसार विभागणी केली जाते आणि दुर्गम भागांतील गरजु लोकांना हे साहित्य वाटले जाते.
नुकतेच या मोहिमेच्या माध्यमाने जमा झालेले साहित्य टिटवाळा परिसरातील कोनापाडा, घोडाखडकपाडा, आडीवली, बेलकरपाडा, बापसई, म्हसरोंडी, दहिवली येथील काथोड, ठाकुर आणि गौरीपाडा तसेच पोटगाव, घोरले, वांजळे आणि शिरगाव येथे वाटप करण्यात आले. कैलास आणि सुखदा देशपांडे यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत जमा झालेल्या प्लास्टिकच्या वस्तु रिसायकलिंगसाठी पुण्यात पाठवण्यात येतात तर कपड्यांच्या कापडी पिशव्या बनवल्या जातात. इतर उपयोगात नसलेल्या कापडापासून विविध उपयोगी वस्तू बनवल्या जातात. नागरिकांनी आपल्याकडील जुने साहित्य त्याचबरोबर प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्य नियोजन करावे पर्यावरणपुरक जीवनशैली अमलात आणावी यांसाठी कल्याण शून्य कचरा संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे असे कैलास देशपांडे यांनी यावेळीं सांगितले.
मोहिमेच्या माध्यमाने जमा होणारे साहित्य अनेकांना उपयोगी ठरत आहे शैक्षणिक साहित्य आणि कपड्यामुळे अनेकांच्या गरजा पुर्ण होत आहेत टीम परिवर्तन हा आमचा युवकांचा गट यापुढेही अनेक गरजु वस्ती पाड्यात ही वाटप मोहीम चालु ठेवणार आहे युवकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळीं टीम परिवर्तनच्या वतीने करण्यात आले आहे.
अनेक पाड्यावर आजही मुलभूत सुविधा पोहचल्या नाहीत शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने यापुढील काळात आम्हीं अनेक सामाजिक संस्थांना एकत्र करून काम करणार आहोत असे चेतन म्हामुणकर यांनी यावेळीं सांगितले. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत कल्याण शुन्य कचरा संकलन, तिरंगा जागृती विचार मंच, स्पर्श फाउंडेशन आणि टीम परिवर्तनचे युवक सहभागी होते.