दिवाळी म्हणजे उत्साहाचा आणि आनंदाचा सण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करत असतो असाच एक प्रयत्न केला प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड कल्याण येथील चिमुकल्या मुलांनी. दिवाळीला कंदील घराबाहेर लावण्याची पद्धत आहे तसेच पणत्यांची खास रोषणाई केली जाते. अनेक आदिवासी भागांत आजही दिवाळीचा कोणताही उत्सव साजरा होत नाही हेच लक्षांत घेवून या शाळेतील शिक्षकांनी आपल्या मुलांकडून विविध आकाराचे कंदील बनवून घेतले त्याचबरोबर आकर्षक पणत्या देखील मुलांनी अगदी आवडीने रंगवल्या.
या सर्व साहित्याचे वाटप टिटवाळा येथील दहिवली या आदिवासी पाड्यावर मुलांच्या हस्ते करण्यात आले. विशेष बाब म्हणजे मुलांनी काही दिवसांपासून आपल्या परीने घरातून धान्य गोळा करून आणले होते. तांदुळ, गहूबरोबरच डाळ असे धान्य मुलांनी गोळा करून यावेळीं या पाड्यावर वाटले. गणेश सुतार, काळे सर, कुवरा सर, शेडगे सर आणि कांबळे मॅडम या शाळेतील शिक्षकांनी मुलांना सोबत घेऊन या सर्व उपक्रमाचे आयोजन केले.
गेल्या चार वर्षांपासून आमची शाळा दिवाळीनिमित्त असा उपक्रम करत आहे आणि यापुढें देखील असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनी सांगितले. या उपक्रमास शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आणि पालकांनी मोठी मदत केली. मुलांनी इकडे फक्त दिवाळीच साजरी न करता आदिवासी भागांतील लोकांचे राहणीमान कसे असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असे यावेळीं शिक्षिका कांबळे मॅडम यांनी यावेळीं सांगितले.
टीम परिवर्तनच्या मदतीने आदिवासी पाड्यावर गेल्या काही काळापासून सातत्याने विविध मोहीम चालु आहेत शैक्षणिक आणि त्याचबरोबर किमान मुलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात यांसाठी आमचे प्रयत्न चालु आहेत प्राथमिक विद्यामंदिर शाळेप्रमाणे इतर शाळांनाही असे उपक्रम राबवावेत असे सागर वाळके यांनी यावेळीं सांगितले.