भालजींच्या’ मराठा तितका मेळावावा’ ह्या चित्रपटातील ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ ह्यातला सहजसुंदर अभिनयातला मावळा म्हणजे काशिनाथ घाणेकर,कायम स्मरणात राहणारा. उभ्या आयुष्यात वडिलांकडून शाबासकीची थापसुद्धा न मिळाल्याची खंत जिव्हारी बाळगत,हीच सल मनात ठेऊन रंगभूमीवर पुर्णपणे बेभान होऊन रंगून गेलेल्या काशिनाथचे संसारदुर्लक्ष झाले,म्हणून खंत बाळगणारी पहिली पत्नी इरावती,आणि निर्माते व प्रतिस्पर्धी यांचे डावपेच अशा अनेकानेक संघर्षाना निमुटपणे गिळून आपली सहजसुंदर अभिनयकला प्रेक्षकांपुढे ठेवणारा एक अवलिया डाॅक्टर म्हणजे काशिनाथ घाणेकर.काशिनाथाच्या अभिनयकलेची सुरूवातही झंझावातासारखी झाली आणि आयुष्याचा शेवटही झंझावातच ठरला.खुप वर्षांनी ‘अश्रुंची झाली फुले’ह्या नाटकाच्या पुनर्प्रयोगासाठी भर पावसात गुडघ्याभर पाण्यात ‘लाल्याच्या’एण्ट्रीची वाट पाहत तिष्ठत बसलेल्या प्रेक्षकांच्या कानावर अचानक काशिनाथची निधनवार्ता येते काय,नि चाहतावर्ग हळहळतो काय?…हे अस्स क्वचितच मराठी रंगभूमीवर घडलंय.
काशिनाथ घाणेकर विक्षिप्त होते,खुप यश कमावलं,पण भरपूर काही गमावलंसुद्धा.त्यांच्याजवळ जितके म्हणुन आले,मग त्या त्यांच्या प्रथम पत्नी इरावती असोत,वा सुलोचनादीदी असोत,भालजी पेंढारकर असोत,वसंत कानेटकर वा मास्टर दिनानाथ असोत,वा त्यांचे परममित्र प्रभाकर पणशीकर असोत,सगळ्यांना त्यांचा त्रास सहन करायला लागला,असा सूर कित्येकांच्या ओठी दिसून येतो.पण माणुस पुर्णत: वाईट होता अस्स वरीलपैकी एकाचही म्हणणे नाही.बंडखोरी व बेफिकिरी वृत्ती जात्याच त्यांच्या स्वभावाशी आयुष्यभरासाठी जोडलेली.
‘रायगडाला जेंव्हा जाग येते’च्या१०० व्या प्रयोगावेळी आलेली बिदागी स्वाभिमानाने नाकारणं,नाटकाच्या निर्मात्याची बिदागीसाठी आग्रही भुमिका दिसताच भडकून उठणं, ते नाटक सोडून देणं,दुसरी मुलगी आयुष्यात येऊन आम्ही लग्न करणार असल्याचं झटदिशी पहिल्या बायकोस सांगणं.ह्या गोष्टी बंडखोरी वृत्ती अधोरेखित करतात.पण सहजसुंदरतेने नटलेला काशिनाथचा अभिनय पाहिल्यावर हे सर्व विसरायला भाग होतं,त्याच्या घा-या डोळ्यातून ओतलेला अभिनय विलक्षण होता.जीवनाचा नट होण्यात हा नट अपयशी जरी ठरला असला,तरी रंगभुमीच्या प्रेमापोटी झिजलेला एक सच्चा नट म्हणून रसिकांच्या कायम ध्यानात राहील.त्यांच्या आयुष्यावरून ध्यानात येते की,जवळची माणसे त्यांना पुर्णपणे समजू शकली नाहीत,हे त्यांचे न समजणे हे काशिनाथला रूचले नाही,सहन झाले नाही.प्रेक्षकांकडून व प्रसंगी दारुड्या रिकामटेकड्या मित्रांकडून त्यांनी ही अपेक्षा केली,पण तिथेही भ्रमनिरासच झाला.ह्या सगळ्यात शेवटपर्यंत त्यांना साथ लाभली,ती प्रभाकर पणशीकर नावाच्या एका जिवलग मित्राची.काही प्रेक्षकवर्ग नाटकातल्या नटाच्या अभिनयास वास्तवातला हिरो समजून त्याचेच अनुकरण करत आयुष्याची वाटचाल करीत असतात.नटाची तशी ओळख आपल्या आयुष्यात जपण्याचा प्रयत्न करतात.
ख-या आयुष्यात नटाचे -हासपर्व झाल्याने त्याचा परिणाम अभिनयावर झालेला त्यांना पटत नाही,असे जेव्हा काशिनाथाच्या आयुष्यात घडते,तेव्हा प्रेक्षकांमधूनच एक बंडखोर लाल्या काशिनाथाला जीवे मारण्याची धमकी देतो,पण उच्चविद्याविभूषित डाॅक्टर काशिनाथने तर याआधीच अतिमद्यसेवनाची सवय लावून स्वतःला कधीच मारून घेतलेलं,हे प्रेक्षकास उशिरा समजायला त्यांचा अकाली मृत्यू कारणीभूत ठरतो.प्रचंड ऊर्जा,त्याला स्टेज न मिळताना त्याची होणारी घुसमट,जवळच्यांनी समजून न घेतल्याची खंत,प्रेक्षकांवरचा त्यांचा जीव,हे रसायन एकत्र झाल्यावर काशिनाथने मनापासून मग स्टेजवर सारं उतरावयाचं,व प्रेक्षकांची मनसोक्त दाद मिळवायची,आणि ती नाही मिळाली म्हणून रुसायचं पण.मास्तर दत्तारामांनी त्यांचा हा अभिनय गुण ओळखला,व आजपासून काशिनाथ पर्व सुरू झालय’अस्स सांगूनही टाकलं,भालजीनीं व वसंत कानेटकरांनी तो व्यवस्थित रित्या गुण वापरून घेऊन आपल्या चित्रपट तंत्रांद्वारे व कसदार लेखणीद्वारे इतरांपर्यंत अभिनयाच्या माध्यमातून पोहचवला,इरावतीने ह्या गुणाचं संयोजन करण्याचा प्रयत्न केला,जिवलग मित्र प्रभाकरने त्यांचा हा गुण सांभाळला,कांचन घाणेकरांनी ह्या गुणास ऊर्जा आणि नवसंजीवनी दिली.पण तरीही राहून राहून अस्स वाटतंय,एक माणूस म्हणुन काशिनाथाला समजून घेण्यात काहीतरी अपुर्ण राहिलंय.माणुस धडपडतो,चुकतो,शिकतो,रागावतो,त्याला अपयश येते,पण पुन्हा प्रतिकारशक्तीने उभा राहतो.पण असो, चहा कित्तीही कडsssक असला तरी तो थंड होतोच.पण नुसत्या कडsssकपणाचीच तुलना करायची झाली तर तत्कालीन नटांमध्ये डाॅक्टर काशिनाथ घाणेकर अग्रगण्यच होत.युवापिढीस कडकपणाची भुरळ घालुन रंगभूमी(नाटक,चित्रपट) पुनर्जिवित करणं.नवनवीन आव्हानात्मक भुमिका लीलया पेलुन शेवटपर्यंत सामर्थ्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारा अवलिया म्हणजे काश्या ऊर्फ काशिनाथ घाणेकर,की”जो वर्गातला सगळ्यात ब्रिलियंट मुलगा ! तो मस्ती हे दाखवायला करतो की,माझं कुणी वाकडं करू शकणार नाही”.प्रभाकरपंताचे हे म्हणणे तंतोतंत खरं ठरतं.
दर्जा ☆☆☆☆
– संतोष राजदेव