संपूर्ण आयुष्यात आपल्या वडिलांकडून शाबासकीच्या थापाची अपेक्षा लावून असणा-या डाॅ काशिनाथ घाणेकर या रंगकर्मीचा अपेक्षाभंग झालेला असतो. पेशाने डाॅक्टर असलेल्या काशिनाथांच रंगभूमीवर अपार प्रेम आणि विलक्षण आकर्षण असल्यामुळे तो रंगभूमीला आपला श्वास समजून पुनश्च संघर्षासाठी उभा राहतो. आणि त्यातूनच संसाराकडे दुर्लक्ष होत जाते. एक चांगला पती, एक मुलगा, एक डाॅक्टर रंगभूमीच्या रंगात हरवून जातो.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचे सोने कसे करायचे? एखाद्या रंगकर्मीला आयुष्यातील नात्यांचा गणित कसा मोजावा लागतो ? प्रतिस्पर्धी, परस्परविरोधकांनी भरलेल्या प्रतिस्पर्धींशी कसा सामना करायचा? संसारात पडलेल्या अंधारावर मात कसा मिळवायचा? जीवनातील जड उतारात कसं स्थिर राहायचं?
अशा अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट अर्थातच ‘आणि डाॅ काशिनाथ घाणेकर’.
डाॅ. काशिनाथ घाणेकर अद्वितीय रंगकर्मी होते. रंगभूमी जणू त्यांच्यासाठी त्याचा श्वास होता. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी हुबेहुबे सुबोध भावेंच्या माध्यमातून डाॅ काशिनाथ घाणेकर आपल्या चित्रपटात रेखाटला आहे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातून काशिनाथ यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरु होते ती ‘अश्रुंची झाली फुले’ या शेवटच्या नाटकापर्यंत सुबोध भावेंनी केलेला अभिनय मनात घर करुन जातो. सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, नंदिता धुरी, प्रसाद ओक, आनंद इंगळे आणि वैदेही परशुरामी यांनी हुबेहुब अभिनय केलाय.
‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील गीत ‘शूर आम्ही सरदार…’ अप्रतिमपणे दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील पटकथा, संवाद, प्रेम अतिशय प्रभावीपणे मांडणी केली आहे. शेवट जरी शोकांतिकाने होत असला तरी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार दृश्य यामध्ये दाखविण्यात आले आहे. अमरावतीतील शेवटचा दृश्य मनाला सुन्न करुन जातो. त्यामुळे सुप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांची शोकांतिका डोळ्यासमोर उभी राहते. याच पूर्ण श्रेय दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आणि अभिनेता सुबोध भावे यांना जातो.