स्वप्नांच्या दुनियेत जाऊन तो तास न तास तिचा हसरा चेहरा आठवत असे. तिच्याशी कधी बोलतो असं त्याला व्हायचं ,राहवत नव्हतं. हृदयात जस त्सुनामी आल्यासारखं होत असे. व्यसनच तिचं त्याला!!!. दिवसातला एक क्षणही त्याला तिच्याशिवाय नकोसा व्हायचा. कधी एकदाचा तिला मेसेज करतो असं त्याला व्हायचं.
त्याचं एकटेपण त्याला खायला उठायचं, मनोमन स्वप्ने रंगवायची कला चांगलीच अवगत होती, स्वप्नांचा राजाच..!!! ज्या गोष्टी वास्तवात घडू शकणार नव्हत्या त्या गोष्टी तो स्वप्नात रंगवायचा. त्याला त्याच्या प्रेमाचं भविष्य माहीत होतं. असं असूनही तो त्या वास्तवाचा सामना करत नसायचा. तो प्रचंड आशावादी होता. त्याला वाटायचं एक तरी दिवस असा उजाडेन की त्या दिवशी सर्व त्याच्या मनासारखं घडेल.
तीही अशीच होती, गोंडस, प्रेमळ, मनमिळावू, समजूतदार आणि जरा अल्लड. तिला इतरांना समजून घ्यायला आवडायचं आणि हीच गोष्ट तिची कमजोरी ठरली. नकळत तीही त्याच्या प्रेमात पडली. तिला कळतच नव्हतं काय करावं, तिला सतत हरवल्यासारखं वाटत होतं, त्याचा निरागस चेहरा सतत डोळ्यापुढं येऊन उभा राहायचा…क्षणभर विचारांचा इतका कल्लोळ होई की तिला वाटे आता डोकं फुटतंय की काय.ती कोणताच निर्णय घेऊ शकत नव्हती.
कधी वाटे आपण का मन मारायचं, मस्त प्रेम करायचं,पुढे जे होईल ते होईल. दुसऱ्या क्षणी तिचं मन म्हणायचं तू तुझ्या घरच्यांना फसवतेस. तुझ्या दोन घडीच्या प्रेमासाठी इतकं मोठं पाऊल तू उचलू नको. मग तिचं मन खिन्न व्हायचं. काय करावं समजत नसे. पण ती थोडं निस्वार्थी होऊन त्याचा विचार करायची तो आणखी एकटाच आहे,आपल्या सारख्या किती तरी मुली त्याच्या आयुष्यात येतील,त्याच भविष्य उज्जवल आहे.उगीच मी त्याला माझ्यात गुंतवून ठेवलं आणि उद्या दोंघांच्या मनासारखं काही झालं नाही तर काय होईल??
नात्यात गुंतण्यागोदरच त्याचा शेवट केलेला बरा असं तिनं ठरवलं, हे करताना तिनं हृदयावर दगड ठेवला होता.त्याग काय असतो हे ती शिकत होती.कधी कधी तिला भडभडून यायचं,क्षणभर तिला वाटायचं का म्हणून त्याग करू मी? मला त्याच प्रेम हव असताना…
पण मन घट्ट करण्याचा तिनं निर्णय घेतला,तिनं ठरवलं दोन हात अंतर राखायचं, एकमेकांत गुंतायच नाही.त्याने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ऐकायचं नाही.कारण हे सगळं ती त्याच्याच भल्यासाठी करत असते.
इकडं याची अवस्था मात्र वाळवंटात हरवलेल्या वाटसरुसारखी झालेली, तहान लागलीय आणि रस्ता सापडेना.तो स्वतःला कोसायचा, माझ्याकडून काय बरं चूक झाली असेन? ती मला आजकाल का टाळते? मी खरंच नकोसा झालोय का तिला?? की माझ्यासाठी म्हणून काही त्याग करतेय?? का सांगत नसेन मला ती काहीच ? काय असेन नक्की….असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात येत होते.
आज खूप दिवसांनी ते एकमेकांसमोर आले होते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. सौभाग्याच्या शृंगारात अधिक खुलून दिसत होती. तिने बापाचा मान राखला होता. बापाच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न झाले होते.त्याच्या हृदयाचे स्पंदने वाढले होते. त्याला तिच्या डोळ्यात विशिष्ट चमक जाणवत होती, डोळे सांगत होते की त्यांच्यातलं नातं संपलेलं नाही. पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याच्या मनातीयल गुंता आजही कायम होता…..
– निलेश पाटील