खूप केलेय तंग वाऱ्याने
आणि झालो भणंग वाऱ्याने
फ़क्त हातात राहिला मांजा
दूर नेली पतंग वाऱ्याने
सोड हिरवा, निळा, अता भगवा
लावला श्वेत रंग वाऱ्याने
ऊन पाऊस शांत निजल्यावर
गायिले मग अभंग वाऱ्याने
आजही लागला तिखट वारा
चारली का लवंग वाऱ्याने ?
खूप रडलाय पाहिल्यावरती
दंगलीचा प्रसंग वाऱ्याने
ऐकतो शांततेत जो, वारा
तोच बनतो मलंग वाऱ्याने
एजाज शेख