काट्यांमधुनी वाट काढणे सोपे नसते
अन काट्यांचे गुलाब करणे सोपे नसते
ज्याच्यावाचुन आत्म्याची जर अपूर्ण यादी
तर त्याचे अस्तित्व विसरणे सोपे नसते
पोटामध्ये शिकला नाही कुणी परंतू
गुरू आरशासमान मिळणे सोपे नसते
विदर्भ अपुल्या कक्षेमध्ये पहा ठेवुनी
शेतकऱ्यांचे मरणे, जगणे सोपे नसते
पोराला खांद्यावर घेणे सोपे असते
पोराच्या थिरडीस उचलणे सोपे नसते
दाद म्हणाली ग़ज़ले, अत्तर कर मिसऱ्यांचे
मोगऱ्याकडुन वाह मिळवणे सोपे नसते
इगो तुझा एजाज आतुनी कर नाहीसा
ग़ज़लेंमध्ये सहज मिसळणे सोपे नसते
– एजाज शेख