शाळेतला एक वर्ग.वर्गातून एक मुलगी धडा वाचताना म्हणते ज्ञानेश्वर महाराजांना माउली (आई ) का म्हणतात ? तर ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आणि एका आईप्रमाणे त्यातून आपले जगावरचे प्रेम दाखऊन दिले.प्रेमाचा प्रपंच म्हणजेच नागराज मंजुळेंचा “नाळ” हा चित्रपट.
प्रत्येक माणूस आप-आपल्या जीवनात आपली नाळ शोधण्याचा प्रयत्न करत असतो.मग ती नाळ अगदी आईपासून ,मूळ गावापर्यंत ,आपलं आडनाव ,आपले पूर्वज,एखादं झाड किंवा एखाद्या नदीत किंवा किल्ल्यात शोधत असतो.
आटपाटनगर शोभेल असं एक साधं खेडेगाव,तशीच खेडेगावची साधी भाषा.पूर्ण पिक्चरमध्ये ना कुणाचा मेक-अप ना कुठल्या पात्रांची घुसावा-घुसवी.चैत्या नावाचं एक ७-८ वर्षाचं गोड-गोंडस पिल्लू.त्या आटपाटनगरात ते पिल्लू स्वच्छ नदीत डुंबायचा,लहाण्या मैत्रिणीसोबत मजा मस्ती करायचा,झाडांसोबत खेळायचा,म्हशीच्या पिल्लासोबत रमायचा,सकाळ सकाळी टघ्या मित्रासोबत टमरेल घेउन परसाकडं जायचा.त्याचा बापपण त्याला ट्रॅक्टरवर एक चक्कर मारून आणायचा आणि त्यात प्रेमळ न दुधावरची साय माय-माउली आई,देविका दफ्तारदार.
सगळं सुरळीत चालू असताना मधेच शकुनी मामा टपकतो आणि त्या चिमुरड्याच्या मनात नाळेचं भूत सोडतो.चैत्या आपली नाळ शोधण्याचा आटापिटा करतो.चैत्या त्याच्या खोट्या आईबरोबर तुटक तुटक वागायला लागतो.त्याचे चित्रीकरण इतकं मस्त केलंय कि रडायला आल्याशिवाय राहत नाही.त्यात बॅकग्राऊंडला व्हायोलिनचा पीस इतका मस्त वाजवलंय कि पिक्चरमध्ये आई,व्हायोलिन आणि इकडं आपण रडत असतो.एकदा आई म्हणतेसुद्धा कि ” चैत्या,असं तुसड्यासारखा का वागतोस ? “.ते लहान पोरगं आपली नाळ शोधण्यासाठी काय काय युक्त्या करतो ते जराही खटकत नाही.अगदी घरात कोण मेलंय ह्याचं भानही त्याला राहत नाही.
आजी(सासू),सून आणि नातू यांची हलकी-फुलकी कॉमेडी मस्त वाटते.
मुलगा आणि बाबा यांचे खूपवेळा एकत्र चित्रीकरण आहे पण एकाही सीनमध्ये बाप उठून दिसत नाही,पोरगं बाजी मारून जातं.फक्त २ मिनिटे आलेली खरी आईसुद्धा खूप छान रंगवलेली आहे.म्हशीचं रेडकू न खर्या आईचं गणित मस्त जमवलयं.
पिक्चर पाहून आपणहि आपली नाळ शोधली पाहिजे ह्यासाठी डायरेक्टर आपल्याला उचकवत असतो.ती नाळ कदाचित आपल्या शहराच्या अस्वच्छ नदीत,कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या किल्ल्यात किंवा आपल्या जवळपास आहे कि काय असं वाटल्याशिवाय राहत नाही.एखाद्याला एखाद्याबद्दल रडायला येणे हीच काय ती आपली नाळ शोधण्याची युक्ती.ती नाळ शोधली पाहिजे, तुमची खरी आई शोधण्याचा प्रयत्न करा.,त्या नाळेवर प्रेम केलं पाहिजे.नात्यांमधे आणि निसर्गात आपली नाळ शोधली पाहीजे आणि त्यासाठी हि “नाळ” पहिली पाहिजे.
– माधव पाणी