गीता संघर्ष सामाजिक संस्था इचलकरंजीच्या माध्यमाने दरवर्षी देण्यात येणारा गीता संघर्ष राज्यस्तरीय सम्राट सम्राज्ञी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. कल्याणच्या अनिकेत बारापात्रे या तरुणांच्या सामाजिक कामांची दखल घेत २०१८ चा आदिवासी कल्याण पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले. कल्याणचा रहिवासी असलेला अनिकेत विविध सामाजिक संस्थासोबत काम करतो साद फाउंडेशन, अंबरनाथच्या मदतीने वांगणी परिसरात आदिवासी भागांत शिक्षण, आरोग्य, पाण्याचा प्रश्न आणि क्रीडा विषयक भरीव काम त्यांच्या माध्यमाने चालु आहे.
कल्याणमधील हलबा सखी मंच आणि सकल आदिवासी संस्थेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवुन अनिकेत दुर्गम भागांतील युवकांचे शिक्षणविषयक प्रश्न सोडवण्यासाठी काम करतोय. आपले कुटुंब, कामाचा व्याप सांभाळत अनिकेत अंघोळीची गोळी संस्थेच्या पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन त्याचबरोबर खिळेमुक्त झाडं मोहिमेचे नेतृत्व करत पर्यावरणविषयक जनजागृती करत आहे. कल्याणच्या टीम परिवर्तन या युवकांच्या गटांच्या माध्यमाने चालणाऱ्या विविध सामाजिक मोहिमाचे समन्वयक म्हणुन अनिकेत सध्या काम करत आहे. अनिकेतला मिळलेला पुरस्कार अनेक युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे युवकांनी सामाजिक कामांत आपले योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित साद फाउंडेशनचे प्रदीप कुलकर्णी म्हणाले.
परिवर्तनाच्या कामांत आपले भरीव योगदान देणारे अनिकेत सारखे युवक देशांची खरी ताकद आहे असे टीम परिवर्तनचे अविनाश पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. हा पुरस्कार अधिक संघर्ष करण्याची सातत्याने प्रेरणा देत राहील त्याचबरोबर यापुढील काळात शिक्षण आणि पाण्याचे प्रश्न यांवर भरीव काम करण्याचा माझा मानस आहे असे अनिकेतने यावेळीं सांगितले. अनिकेतचा संघर्षमय प्रवास जवळुन बघतांना सतत काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मला मिळते त्यामुळें वंचित दुर्बल घटकांसाठी चालणाऱ्या या कामांत माझा सहभाग नकळतपणे वाढला आहे असे स्वेताली बारापात्रे यांनी सांगितले.