मुंबई | अखेर रात्री ११ वाजता विद्यापीठ व मॅनेजमेंट काउन्सिलने केली उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात चौकशी समितीची घोषणा. सदर समिती गठित करावी म्हणून काल अभाविपने दुपारी १२ वाजतापासून मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस येथे आंदोलन सुरू केले होते. यावेळी मुंबई विद्यापीठ मॅनेजमेंट काँसिलची बैठक सुरू होती. दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू सोबत चर्चा झाल्यानंतरही जोपर्यंत याप्रकरणाचा निर्णय होणार नाही तो पर्यंत अभाविप ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांना सांगितले.
अखेर रात्री ११ वाजता विद्यापीठ कुलसचिव प्रा सुनील बिरुड, डीन प्रा भांबरे, काउन्सिल सदस्य ऍड नील हेळेकर यांनी अभाविपच्या आंदोलनकारी विद्यार्थ्यांना संबोधत उत्तरपत्रिका खरेदी घोटाळा प्रकरणासाठी ५ सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली, तसेच यातील दोषींवर योग्य ती कारवाई होण्याचे सांगितले.
सदर निर्णय घेण्यास विद्यापीठाने खूप वेळ घेतला अशी खंत यावेळी कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केली. तसेच या चौकशी समिती मार्फत उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची योग्य ती चौकशी होवून दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत हा अभाविपच्या संघर्षाचा विजय असल्याचे ओव्हाळ यांनी सांगितले.