साधारण तीन वर्षांपूर्वी एक कविता लिहिली होती.”आई मला ह्या जगात नाही यायचय! जन्म होताच माझी हिंदू , मुस्लीम किंवा ख्रिश्चन या धर्मात विभागणी केली जाईल.मला स्वतःला धर्मात नाही विभागायचय.मला ह्या जगात नाही यायचय.”
पण आता तीन वर्षानंतर लेख लिहावासा वाटला.”आई मला शाळेत नाही जायचय”.मुलांना शाळेच्या उंबरठ्यावर घेऊन जात असताना समोर बरेच उंबरठे दिसतात.काही उंबरठे साधे तर काही खूपच सजवलेले. मग मनात काहूर माजत नक्की मुलांना घेऊन कोणता उंबरठा ओलांडावा? S.S.C, ICSE, CBSE, IG आणि बरेच अजून. महाराष्ट्राचा विचार केला तर हे चार शैक्षणिक मंडळे शिक्षणाचा भार उचलताना दिसतात. प्रत्येक मुलाला एका मंडळातून १०वी उत्तीर्ण करायची असते. मग त्यानंतर सगळेच समान.म्हणजे ते असं झालं कितीही नद्या असल्या तरी त्यांचा मार्ग हा सागराच्याच दिशेने असतो. मग त्यांचा मार्ग खडतर का करावा? अरे कोवळे जीव ना ते…
आपले राज्य महाराष्ट्र….. नागरीक शास्त्रात शिकवले जाते “आपले अधिकार- स्वातंत्र्यता आणि समानता…..पण खरच मुलांना शिक्षण समान पद्धतीने दिले जाते का? प्रत्येक बोर्डाचा अभ्यासक्रम हा वेगळा, त्यांची मूल्यमापन पद्धती वेगळी, शिकवण्याची पद्धत वेगळी….का? खरच ह्याची गरज आहे का? राज्यात किवा देशात एकच शिक्षण पद्धती नाही का लागू होऊ शकत? एकच बोर्ड देशात लागू झाला तर मुलांच्या शिक्षणात समानता येईल आणि १०वी नंतर प्रवेश घेताना कुठलीच तफावत होणार नाही.
हा लेख मी स्वतःच्या अनुभवावरून लिहित आहे.आजचे पालक मुलांच्या शिक्षणाबाबतीत खूपच जागृत आहेत.पण तेही ह्याच विचारात दिसतात कि मुलांना कुठल्या बोर्डात घालायचे? त्यांचा हा प्रश्न कोण दूर करणार?
Play group च्या पालकांशी माझे बोलणे झाले व त्यांचे मत ही मी घेतले. बर्याच जणांचे मत हे International Boards च्या बाजूने होते.इथे आपण मुलांना Respect for nation , National Integration चे धडे देतो व शाळा मात्र International Boards असलेले पाहतो? नवलच आहे नाही?.
आजकाल सर्व पालक आपल्या पाल्यांना घोड्याच्या शर्यतीत जसे घॊडे धावतात,तसे धावायला लावतात. काही अंतिम रेषेपर्यंत पोहोचतात तर काही मध्येच थांबतात. पालकांना वाटते माझा मुलगा सगळ्याच बाबतीत अव्वल हवा. तो अभ्यासात असो किंवा कला, क्रीडात. त्यामुळे ते मोठ्या-मोठ्या कॉन्वेंट किंवा International School मध्ये ऍडमिशन घेतात. आपण तर मराठी शाळेत शिकलो,आपली ही प्रगती झालीच ना? आपण ही तेवढ्याच जबाबदार्या तत्परतेने पार पाडतोय .मग आता लोकांच्या दृष्टीकोनात एवढा बदल का झालेला जाणवतो?
आजच्या युगात इंग्रजीत बोलणं हे सभ्यतेचे व ज्ञानाचे
लक्षण समजले जाते. मराठी किंवा हिंदी बोलणारा माणूस अज्ञानच समजला जातो. ती परिस्थीती लांब नाही जेव्हा आपल्या देशात आपल्याच भाषेच्या शाळा बंद होतील व International Factoryत तयार झालेले फाडफाड इंग्रजी बोलणारे ,देशाची संस्कृती माहित नसलेले रोबो तयार होतील. एका पालकांशी चर्चा करताना त्या म्हणाल्या,”मी तर माझ्या मुलीला या या प्रसिद्ध शाळेत टाकलय .IG बोर्ड आहे”.फी विचारली असता त्या म्हणाल्या,” IG बोर्डाच्या हिशोबाने सर्वात कमी फी याच शाळेत आहे.Nursery च्या दाखल्या साठी आम्ही १ लाख
२५ हजार भरले”.मला त्या वेळी हसूच आले. अरे तेच पैसे १०वी नंतरच्या शिक्षणासाठी जास्त उपयोगी पडतील.तेव्हा पैश्यांची जास्त गरज लागेल हो की नाही? खरच मनात काहूर माजलाय…….तुम्हीच सांगा कोणते Educational Board चांगले?
– नेहांकी संखे