जग हे क्षणोक्षणी बदलत असते’…आणि ह्याच बदलणा-या आभासमयी जगात जो तो आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतो.कालचा भुतकाळ चांगला होता,असे समंजसपणाचा आव आणुन रेटून बोलणा-यांना नव्या वास्तवातल्या जगाशी व्यवहार करावाच लागतो,मग भले तो तात्कालिक का असेना.2010 सालचा रजनीकांतचा रोबोट’चिट्टी’हा ही पडद्याआड पक्षीराजनशी लढताना लढाऊपणानं जाणं कैक रजनीफॅनला रुचलं नसणार.पण तेही कौशल्याने रोबोट 2.O चित्रपटात दिग्दर्शकाने उत्तमरित्या दाखवलय.रजनीप्रेमींची उत्सुकता ताणण्यासाठीची पार्श्वभूमी छान वठलीये.
दिग्दर्शकाने ह्याहीपुढे जाऊन 2.O कमी पडल्यास यापुढे येणारा युक्तीबाज 3.O कसा असेल,याचेही सूतोवाच दिलेत. रजनीकांत म्हणजे अफलातून,भन्नाट,कडक अभिनय व त्याची जनमानसातील क्रेझ,सुंदर पटकथा,दिग्दर्शन व व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या सर्वांचा सुबक समन्वय म्हणजे रोबोट 2.O.रजनीकांतच्या फॅन्सला हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच.मानवी आयुष्यात तंत्रज्ञानाचं होणारं अमर्यादित आक्रमण व त्याच्या अतिवापराने संकटात सापडत चाललेली नैसर्गिक साधनसंपत्ती, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरावर अंकुश लागावा म्हणून त्याच्या मर्यादा स्पष्ट होणं,हा आजच्या वर्तमानातला ताजा विषय चित्रपटाने हाताळलाय. एक सामाजिक संदेश देऊन निसर्गाविषयी प्रेम दाखवण्याचा हा एक प्रयत्न असेच म्हणावे लागेल.
चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर अति झाला असला तरी तो योग्यसमयी झाला असल्यानेच बघताना तो अधिक रंजक वाटतो.शंकरचे बरेचसे चित्रपट काल्पनिक अवास्तववादी असले तरी त्यात खिळवून ठेवणारी तर्कयुक्त साचेबद्ध मांडणी दिसुन येते.ह्याठिकाणीही गुढ,रहस्यमय अशा’होरा’या संकल्पनेचा आधार घेऊन चित्रपटाची कथा आखलीये.जिवंतपणी वा मरणोत्तर व्यक्तीचे तेज ह्या होरामधून परावर्तित होत असतं.प्रभावशाली लोकांचं हे तेज,अखंड-अमर्यादित व समजण्यापलीकडचं असतं.त्या त्या व्यक्तीच्या अतृप्त इच्छा,आकांक्षा व कामना ह्याच्यामुळे त्यात कमी जास्त पणा येत असतो,असे होराचा अभ्यास करणारे नेहमी आपल्याला सांगताना दिसतात.
एक पक्षीराजन(अक्षय कुमार)नावाचा व्यक्ती, ज्याला जन्मजातच पक्षांची विशेष आवड आहे.जन्मल्यावर चिमणीच्या आवाजाने ज्याचा बंद पडलेला श्वास पुन्हा सुरू झाला.अशी व्यक्ती जसजशी वाढते तशी ती पक्षीनिरीक्षणात पारंगत होते.पण सुदैवाने/दुर्दैवाने(?)नव्याने आलेले सेलफोन व रेडिऐशनच्या तंत्रज्ञानाचा अतिवापर हा त्या पक्षांचा -हास होण्यास कारणीभूत ठरत असतो.पक्षी आपले दिशांचे ज्ञान विसरुन भरकटतात,व त्यांच्या जाती-प्रजाती पतीच्या प्रवासात नष्ट होतायेत.ह्याने पक्षीराजन उद्विग्न होतात.कैक सुज्ञांस समजावण्याचा प्रयत्न करतात.ढिम्म प्रशासनाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढा देतात,न्याय आर्थिक तिजोरीच्या बाजुने लागतो.आपलं कुणी ऐकूनच घेत नाही,तरीही सेलफोनच्या वापरावर संयम आणा,हे ओरडुन सांगतात,आंदोलनाच्या द्वारे सांगतात.पण त्यांचं म्हणणं कुणीच ऐकुन घेत नाही,उलटपक्षी विरोधच होतो,शेवटी पक्षीराजन हताश हतबल होऊन आत्महत्या करतात.
वास्तवात कंपन्यामध्ये स्वार्थापायी चालु असलेल्या स्पर्धात्मक चढाओढी,त्यातुन रेडिऐशनची वाढवली जाणारी मर्यादा,जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला सेलफोन,तो नसताना उडालेली भंबेरी,पक्षीराजनच्या आत्महत्येनंतर मरणोत्तर पक्षीराजनने सेलफोनच्या आहारी गेलेल्या मनुष्यांना मारुन घेतलेला बदला,ह्या गोष्टी चित्रपटाच्या कथेत गुंतण्यात व त्यातील सुसूत्रता आणण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय…..शेवटी काय रजनीच तो..पक्षीराजनविरुद्ध..जिंकल्याशिवाय थोडीच राहणार…अखेर जय त्याचाच…पक्षीराजनचा बदला घेतलेलं पाहणं म्हणजे सेलफोनच आपला बळी घेताहेत,अस्संच क्षणभर वाटलं….निव्वळ इतकं जरी प्रेक्षकास वाटलं तरी चित्रपट सामाजिक भान उभं करण्यात यशस्वी झाला असेच म्हण्टलं पाहिजे.
– संतोष राजदेव