थांबत नसतात पावले
ज्ञानाची ओस लागल्यावर
ती चालत राहतात
सत्याच्या मुळांचा पसारा शोधेपर्यंत
खोट्या इतिहासाचे वैकुंठ
खोट्या खोट्या चमत्कारांची मात्रा
दुसऱ्यांच्या मेंदूवर चिटकवून
तुम्ही नाही लादू शकतं
आपले तकलादू पुरावे
आणि नाही लपवू शकतं
आपली षडयंत्रे
सत्याचा बुलडोझर चालत असला सावकाश तरी
तो खोदत जातो खोट्याचं अंतरंग पाळांमुळांसकट
पाडतो उघडा चकचकीत पसारा
जो दाबला गेला होता अनंत काळापासून
खऱ्याचा वाली न उरलेल्या जगात
विद्रोहाचा तुकाराम मनामनात भिनवा
करा तांडव त्या रुढीबाज धर्ममार्तंडाविरुद्ध
उच्चनीच पुकारा करणाऱ्या सनातन्यांविरुद्ध
ज्यांनी फुटू दिली नाही पालवी
निरागस मेंदूला
भरू दिलं नाही
ज्ञानचं आभाळ रक्ताच्या थेंबात
पण ध्यानात ठेवा!
तुमचाही होऊ शकतो खून
किंवा तुम्हीही जाऊ शकता सदेह वैकुंठाला
शतकानुशतके
– डॉ.कृष्णा सुभाष सपाटे