सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, चारा छावणी, नदीजोड प्रकल्पाची मागणी, टॅकर माफियांचे जाळे, पाण्यासाठी होणारी वणवण पर्यायाने होणारे स्थलांतर, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारीचा प्रश्न अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना युवक म्हणुन आपण काय करू शकतो असा प्रश्न पुण्यातील माधव पाटील या युवकाच्या मनी आला आणि त्यातुनच अंघोळीची गोळी ही संकल्पना उदयास आली. सरळ सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास पाणी बचतीसाठी आपल्या सोयीने आठवड्यात किमान एक दिवस अंघोळ करायची नाही म्हणजेच अंघोळीची गोळी घ्यायची आणि पाणी बचत करायची मात्र हा अर्थ इतकाच मर्यादित नाही.
अंघोळीची गोळी प्रामुख्याने चार तत्व आपणास सांगते प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत. पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि ठिकठिकाणी पाणी बचतीचा संदेश देणारी अंघोळीची गोळीद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येते. त्याचबरोबर विविध व्यासपीठ आणि शिबिरांच्या माध्यमाने पाणी बचतीची ही संकल्पना युवकांपर्यंत पोहोचवण्यात येते. अंघोळीची गोळी संस्थेच्या मी पाणी अंघोळीची गोळी या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि पाणी बचतीची ही मोहीम व्यापक होवु लागली. पुढे पॅरिस करारातुन माघार घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्या करारावर स्वाक्षरी करावी यांसाठी मोठ्या प्रमाणात युवकांनी पुढाकार घेतला.
जागतिक तापमानवाढ, प्रदुषण ह्या गोष्टी नाकारणारे ट्रम्प प्रेम, बंधुभाव, त्याग, बचत या गोष्टीवर विश्वास ठेवत नसले तरी जय जगत या विनोबांच्या शिकवणीला आम्हीं मानतो म्हणुनच अमेरिकेतील आमच्या बांधवासाठी आम्हीं अंघोळीची गोळी घेतो म्हणजेच पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी शक्य ते प्रयत्न करतो आणि जगातील प्रत्येक नागरिकाने हे प्रयत्न करावेत हा व्यापक अर्थ याद्वारे संस्थेचे कार्यकर्ते सांगतात. पुण्यातील ही चळवळ पुढे थेट मुंबईत सुरु झाली. सागर वाळके आणि चेतन पाटील या तरुणांनी पुढाकार घेत ठाणे आणि मुंबईत अंघोळीची गोळी आणि युवकांची भुमिका यांवर काम सुरु केले. पाणी आणि पर्यावरण विषयावर पहिलावहिला दिवाळी अंक देखील काढण्यात आला, दिवाळीनिमित्त पाणीदार किल्ले स्पर्धा, त्याचबरोबर सोशल मिडीयाच्या माध्यमाने अल्पावधीतच ही मोहीम अनेकांपर्यंत पोहोचवण्यात आली. मुंबईतील पहिले प्रदर्शन वांगणीजवळील बेडीसगाव येथे घेण्यात आले. सध्या टीम मुंबईतील युवक विविध भागात, शिबिरात आणि सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात अंघोळीची गोळी ही संकल्पना लोकांना समजावुन सांगण्यासाठी प्रयत्न करत आहे. अंघोळीची गोळी अंतर्गत सध्या पुणे आणि मुंबई, ठाणे परिसरात खिळेमुक्त झाडं मी मोहीम मोठ्या प्रमाणात चालु आहे. झाडांनाही वेदना होतात आणि या वेदना कमी करण्यासाठी सध्या ही युवक मंडळी काम करत आहे.
महात्मा गांधीच्या सत्य, अहिंसा या गोष्टींना त्याचबरोबर हा संगर केवळ पाण्यासाठी नसुन प्रत्येक सजीवाच्या मुलभूत अधिकारासाठी आहे या डॉ. आंबेडकरांच्या शिकवणीला अंगिकारत ही युवक मंडळी जोमाने काम करत आहे. पुणे मुंबईबरोबरच प्रत्येक शहरांत खेड्यापाड्यात युवकांनी पुढाकार घ्यावा आणि अंघोळीची गोळी ही पाणी बचतीची गोळी घेवुन युवकांनी समाजासाठी योगदान द्यावे असे अंघोळीची गोळी आपणास सांगते. अंघोळीची गोळी संस्थेच्या खिळेमुक्त झाडं अभियान अंतर्गत झाडांवरील खिळे, पोस्टर, बॅनर काढण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांत सातत्याने चालु आहे. झाडांना वेदनामुक्त करण्यासाठी चाललेल्या या उपक्रमांत झाडांना आळे करणे, बॅनर पोस्टर, खिळे काढणे हे काम विविध संस्था, युवकांच्या मदतीने आणि वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार करून संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीने चालु आहे याचं कामाला वसई- विरार शहर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रकटनाने अधिक व्यापकता मिळणार आहे.
खिळेमुक्त झाडं मोहिमेचे मुंबई समन्वयक तुषार वारंग यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे त्याचबरोबर सर्व युवकांच्या आणि संस्थाच्या एकत्रित कार्याचे हे यश आहे असे देखील यावेळीं त्यांनी सांगितले. पिंपरी- चिंचवड आणि वसई- विरार महानगरपालिकेने वृक्ष संवर्धनासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांनी लवकर घ्यावेत यांसाठी आम्हीं प्रत्येक जिल्ह्यात युवकांचे संघटना सध्या उभारत आहोत आणि नक्कीच या मोहिमेला व्यापक यश यापुढें मिळेल असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे ठाणे समन्वयक अविनाश पाटील यांनी यावेळीं सांगितले. वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रांत डॉ. गणेश कदम आणि अमृता पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली खिळेमुक्त झाडं मोहिमेचे कामकाज चालु आहे.