पुणे | हिव्हाळा म्हटलं की थंडी ही आलीच पण यंदाच्या थंडीचा कडाका पुढील दोनतीन दिवसात पुन्हा सक्रिय होणार हे निश्चित. येत्या दोनतीन दिवसात राज्यात थंडीची लाट येणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या देशात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात थंडीची लाट सुरू असून तेथून वाहणारे वारे राज्यात येऊन शिरकाव करणार आहे.
येत्या तीनचार दिवसात खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार ह्या जिल्ह्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवेल. पुणे महानगराचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात थंडी आहे. येत्या तीन दिवसात विदर्भासह मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीची जोरदार लाट जाणवेल.