शहरांचं आकर्षण म्हणा किंवा पोटापाण्याची चिंता म्हणा ठराविक वर्गातले,विभागातले काहीजण एक विकल्प म्हणुन सुरुवातीला स्थलांतरीत होतात.हाच स्थलांतरीत झालेल्यांचा काहीजणांचा समुदाय शहरात विशिष्ठ परवडणा-या ठिकाणी सुरूवातीस येतो.सुरुवातीला एकले-दुकले येणारे नंतर काहीसे नोकरीधंद्यात सुस्थावर झाल्यावर त्या शहराच्या विशिष्ठ विभागातच संसार घेऊन येतात वा थाटतात.अशांच्या शहरी थाटमाटाचा,आकर्षणाचा कष्टवजा डामडौलपणाचा संदेश हा जेव्हा त्यांच्या मुळगावी पोहोचतो,तेव्हा त्याच्या ओढीने बाकीचेही येऊन राहु लागतात.संख्या कैक पटीने वाढतच जाते.रस्ते गजबजू लागतात.कमी माणसांची रांग ही अधिक माणसांची रोजरोज वाढणारी रांग कधी होऊन गेली,हे कळतच नाही.परिणामी तिथल्या नागरी सुविधेवर व प्रशासकीय सेवेवर ताण पडु लागतो.तेव्हा परत नव्याने स्थलांतरण होऊ लागते.मुळवासी वर्गाला थोडीशी आर्थिक सुबत्ता आल्यावर ते ही दुस-या ठिकाणी जाऊन राहु लागतात.बदलांच्या वेगाचे हे चक्र अधिक गतीने फिरते.शेजा-यापाजा-यांचं राहण्याचं ठिकाण बदलु लागतं.सुखाच्या मृगजळी आंकाक्षेपायी जो तो त्याच्या गतीने निर्णय घेऊन धावत असतो.त्यातल्या कैकजणांना सुखाची लाॅटरी लागते,कैकजणांना ती लागत नाही.अशाच काही परिस्थितीतला मुंबईचा एक परिसर म्हणजे मानखुर्द परिसर.
स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षात आकंठ बुडालेला हा वर्ग.आज नाही कमावले तर उद्याच्या खाण्याची भ्रांत असणारा,कष्टांची सवय झालेला हा वर्ग.विभागास काही सामाजिक,राजकीय वा सांस्कृतिक इतिहास असला तरी तो सगळ्यानांच माहिती असेल वा तो जाणणं आवश्यक आहे,असंही कित्येकांना वाटत नाही.आधुनिक जगात संदेशवहन बदललं,पण आवड मात्र तिच.काटकसर करुन पैसा गुंतवणुक न करता संग्रही करुन ठेऊन पुन्हा काबाडकष्टास तयार राहणारा हा वर्ग.राजकीय वा सामाजिक घडामोडी समजण्यासाठी सुद्धा पेपर घेताना सतरा वेळा विचार करणारा हा वर्ग.रांगाच रांगा मग त्या सुलभमधल्या असोत वा दुकानातल्या वा रेल्वे तिकीट खिडकीवरच्या त्या दिवसेंदिवस वाढल्या तरी कुरबुर न करता रांगेत तिष्ठत राहणारा हा वर्ग.इथे ऑफरसाठीही तासनतास ताटकळणारे पदोपदी दिसतील,म्हणूनच सामाजिकतेचा बडेजाव करुन काही स्वार्थसाधू व्यक्ती स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी अशा परिस्थितीचा वापर करुन घेण्यात इथे पटाईत आहेत.आपण विकले गेलो आहोत,हे बहुधा विकल्या गेल्यानंतर सुद्धा काहींना इथे समजत नाही.आत्ता ते अन्यराज्यीय वा अन्यतालुकीय ह्या विषयाच्या फंदात मी पडत नाही.मुळात हा पत्रप्रपंचच त्याकरता नाहिये.इथल्या विभागाचा सर्वकंषविकास जर घडवायचा असेल तर नेमक्या बाबींत सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे माणसाचे जाणतेपण जागवणे.नेमके हेच ह्याठिकाणी अंत्यत कठीण आहे.
विविध भाषिक,विविध धर्मीय,ब-याचजणांचा बराचसा वेळ हा कष्टात जात असल्याने सामाजिकदृष्ट्या पुढारीपण घेण्यामागची अनास्था इथे कायमचीच !स्वसामर्थ्याचे पुर्णभान नाही पण तरीही विश्वासावर अवलंबून राहणारा हा वर्ग तसा आहे मनमिळाऊ,सुखदुःखात पटकन सामील होणारा,अगदी चाळीत एखाद्याचा वाढदिवस असला तरी अख्खी चाळ हातातले काम सोडुन हजर होते.खेळायला पटांगण नसल्याने २०x २० च्या जागेत अंडरआर्म क्रिकेटचे सामने सुद्धा इथेच भरतात.खेळताना चित्रपटाच्या फोटोचे व गोट्यांचे खेळ सुद्धा ह्याठिकाणीच विकसित झाले.कित्ती तरी अशिक्षिंतांना इथल्या नगरसेवक,आमदारांची नावेही माहिती नसतील परंतु अमिताभच्या चित्रपटाच्या नावांची यादी पाठ आहे.अजुनही ह्या ठिकाणी क्रिकेट सामने पाहण्याकरता वा अमुक चित्रपट पाहण्यासाठी टिव्हीच्या दुकानासमोर गर्दी जमते.प्रत्येक निवडणुकीत इथल्या नागरीकांचा मुख्य विषय म्हणजे नागरी सुविधा प्रश्न?.राजकारण्यांचे पिकही इथे निवडणुकांच्या वेळेसच उगवते.दर ५ वर्षांनी ह्या पिकास नवनवी पालवी फुटू लागते.आशा,अपेक्षा,आश्वासनांचा निवडणुकींच्या सभांना अक्षरशः पूर येतो.ऐकुन कान त्यावेळेपुरते का होईना पण तृप्त होतात,आणि त्यां अमुक अमुक मतांनी ओंजळ भरते.आणि एकदा का मतांची ओंजळ भरली की,कल्पनाविस्तार करुन सांगितलेली आश्वासने हवेतच विरतात.आणि पुन्हा इथल्या काॅमन मॅनची कष्ट करुन खाण्यासाठीच्या धावपळीतली वेळ जवळ येते,व तो धावू लागतो…..कुठे जायचंय?…..”माहिती नाही”…कशासाठी करतो?….तर उद्याच्या भाकरीसाठी….भविष्याचे काय?…तर…बघू…………आजचा दिवस निघाला ना….मग बस्स.
…..
– संतोष राजदेव