नवी दिल्ली | खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवी दिल्ली येथे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री.एन.के.सिंग यांची भेट घेवून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या विकास आणि संवर्धन या बाबत चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील गडकोट, किल्ले हे केवळ महाराष्ट्रा पुरते मर्यादित नसून त्यांचा देशाच्या इतिहासात खूप मोठा वाटा आहे. जगाच्या पाठीवर एवढे वैभवशाली आणि ज्वलंत इतिहास असलेले किल्ले कुठेही पाहायला मिळत नाहीत. त्यांच्या अवती भवती आजही अत्यंत समृद्ध परंपरा व निसर्ग आहे. एवढे असूनही आजपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. खूप वेगाने आपण आपल्या या जिवंत वारसा स्थळांना गमावत आहोत, त्यांचे जतन आणि संवर्धन झालेच पाहिजे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगाने अतिरिक्त निधी राज्यसरकारकडे सुपूर्द करावा. सुरुवातीला सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करणे शक्य नसले तरी आपण काही मोजके किल्ले घेऊन कामाची सुरुवात करू शकतो अशी मागणी खा.संभाजीराजेंनी श्री.एन.के.सिंग यांचेकडे केली.
केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या पर्यटन वाढीमध्ये महाराष्ट्राचे गड किल्ले महत्वाची भूमिका निभावत आहेत. ज्या पद्धतीने रायगड विकास प्राधिकरण मार्फत रायगड किल्ल्याचा विकास सूरू आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्याचा विकास व्हावा अशी मागणी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी श्री.एन.के.सिंग यांच्याकडे केली. किल्लेसंवर्धनासाठी शेकडो कोटी रुपयांची आवश्यकता आहे. परंतु ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्वाच्या पण दुर्लक्षित असणाऱ्या किल्ल्यांसाठी तात्काळ स्वरूपात १५० कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी या भेटीदरम्यानश्री. एन.के.सिंग यांच्याकडे केली.
श्री.एन.के.सिंग पुढे म्हणाले कि आमच्या आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाला आहे, आपण केलेली मागणी ही योग्य आहे. मी तात्काळ पुढच्या बैठकीमध्ये हा विषय समाविष्ट करतो. आपण जर सर्वच किल्यांसाठी म्हणाला असता तर ते व्यावहारिक दृष्ट्या शक्य झाले नसते. तुम्ही नेतृत्व करत असलेल्या रायगड विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. आमच्यापरीने शक्य ती सर्व मदत करतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना ज्या किल्ल्यांनी शिवरायांना मोलाची साथ दिली असे किल्ले हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव आहे. हीच खरी स्वराज्याची प्रेरणास्थाने आहेत हे ऐतिहासिक वैभव पुढील पिढीसाठी जतन व संवर्धन करून ठेवणे ही आपली खरी जबाबदारी आहे. काही किल्ल्यांची तटबंदी अस्तित्वात आहे तर काही ठिकाणी ढासळत आहेत. वेळीच या किल्ल्यांची दुरूस्ती केली नाही तर काळाच्या ओघात हे ऐतिहासिक वैभव नष्ट होण्याचा धोका आहे. यासाठी मिळणारा निधी आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी येणारा खर्च आपुरा पडत आहे. याचा विचार करून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेवून किल्ल्यांसाठी मागितलेल्या निधी मुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त किल्ल्यांचे संवर्धन व विकास झालेला आपणास लवकरच पहावयास मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.