अनेक वर्षापूर्वी या मुंबईनगरीत मिलचे भोंगे वाजायचे, या मिलमध्ये काम करणारा प्रत्येक कामगार बहुतांश मराठी होता. जमना बदलला तसं राजकारण बदललं, वाटाघाटीचं राजकारण सुरु झालं.गिरण्या बंद पडल्या, आंदोलनं झाली, पडद्यामागे वाटाघाटी झाल्या,अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणूस मेला..!!
हो..हो मेला..त्यावेळीचा कामगार हा लढवय्या होता, तो आपल्या न्यायहक्कासाठी लढला खरा पण, अपयशी ठरला, परिणामी कोणी जीव सोडला, कोण मुंबईच्या बाहेर गेलं, तर कोणी आपलं गाव गाठलं.. आता मुंबईत मराठी कुटुंब जगत आहेत ती काही प्रमाणात याच, गिरणी कामगारांची पिढी आहे. रोज सकाळी धक्का खात कामावर जायचं, कुठल्या तरी चेंगरा चेंगरीत मरायचं, सुखरूप घरी आलो तर देवाचं आभार मानायचे आणि एक तारखेल्या येणा-या पगारात घर चालवायचं, अशी सध्या मध्यमवर्गीय मुंबईत रहाणा-या मराठी माणसाची व्याख्या आहे.
हा बेस्ट कामगार म्हणजे कोण, तुमच्या आमच्यासारखाच गर्दीतला एक चेहरा, आता हाच चेहरा आरशासमोर उभा राहिला का, त्याला समोर स्वत:तला एक गिरणी कामगार दिसतोय. पुन्हा एकदा आपलं अस्तित्व टीकवण्यासाठी रस्त्यावर उतरलाय.आपल्या न्यायहक्कासाठी तो टोकाची लढाई लढतोय. छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या या मातीत लढाई कशी जिंकायची हे मराठी माणसाला सांगयाची गरज नाहीय…
बेस्ट कामगारांनी आपली तलवार उपसली ती आता म्यान होणार नाही…या तलवारीनं तो लढेल अथवा स्वत:ला संपवेल अशी सध्याच्यी परिस्थिती आहे…या मेस्माच्या धमकीनं तो आणखीन चिडलाय…कारण ही लढाई महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे….”करो या मरो”च्या लढाईत कनिष्ठांच्या मागणीसाठी वरिष्ठ खांद्याला खांदा लाऊन उतरलाय..बेस्टच्या इतिहासातलं सर्वांत आक्रमक आणि पहिल्यादांच एवढे दिवस चालेलं आंदोलन आहे
पण यांचा गिरणी कामगार होऊ नये एवढंच वारंवार वाटतं. मुंबईत आज मिलच्या भोंग्याची जागी पबमधल्या गाण्यांच्या आवाजांनी घेतली, उद्या बेस्टची जागा रिलायन्स किंवा इ बड्या कंपनींच्या हायफाय जीओसारखी सेवा देणा-या फुकटातल्या बसेस घेतील…पण मराठी माणसाचं काय? त्याचा परत गिरणी कामगारच होणार? तुटपुंज पगारामुळे घरातला संसार आणि मुलाचं शिक्षण देताना सध्या आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीय..शेतकरी कर्जबाजारी होती तसाच हा बेस्ट कर्मचारी अनेक कारणांनी कर्जबाजारी आहे.. याला वाचवलं पाहिजे. तो वाचला पाहिजे..
मराठी माणसाच्या नावानं मतं मागणा-या राजकीय पक्षांची, नेत्यांची किव येतं.. “बेस्ट कर्मचा-यांचा संप सुटला पाहिजे, आम्ही त्याच्या पाठीशी खंबीर आहोत”, हे बोलताना लाजा वाटल्या पाहिजे..या पुढे मराठी माणसाच्या नावानं मतं मागण्याचा अधिकार सर्वच राजकीय पक्षांनी गमवलाय. अरे ज्या बेस्टची सत्ता वर्षानुवर्ष हातात असूनही तासंतास बैठका घेऊन काही निघत नाही ना? हेच मोठं अपयश आहे. एका जमान्यात बेस्ट बंद बोलल्यावर बंद व्हायच्या,
पण आता बेस्ट सुरु म्हंटलं तरी बंदच राहतात..
हेच दिवस बघायचे बाकी होते, तिही जागा बेस्ट कामगारांनी दाखवून दिली आहे. अरे जर बेस्ट कर्मचारी जगला पाहिजे असं जर वाटतं तर एवढे दिवस काय झोपला होतात? पावसाच्या पाण्यात साचलेली मुंबई असेल, दिवाळी-दसरा असेल किंवा गणपतीचा सण असेल प्रत्येक वेळी या हा कामगार मुंबईच्या सेवेसाठी कधी मागे हटला नाही. तो सदैव या मुंबईच्या पोरा-बाळांसाठी पुढे आला.
पण या कामगारांच्या पाठिवर कधी कौतुकांची थाप पडलेली पाहिली नाही.. या कामगारानं कधी अपेक्षाही केली नाही, तो तेव्हाही लढला, आजही लढतोय त्याला किमान आता तरी साथ द्या!! त्याच्यासमोरच्या अडचणी सोडवणं शक्य नाहीय, कळतंय, पण मार्ग तर काढा आणि किमान लढ तरी म्हणा!!
त्याच्या मागण्या आजच्या नाहीय अनेक वर्षापासूनच्या आहेत, का नाही त्याच्या मागण्या सोडवल्या? का नाही त्याच्या सोबत कधी चर्चा केली? का त्याला रस्त्यावर उतरावं लागलं? फक्त राजकारणाचा बळी बेस्ट कामगार पडलाय.त्याच्यामागे खंबीरपणे उभं राहण्याची हिच खरी वेळ आहे.
मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार या संपात
पूर्णपणे अपयशी ठरलंय. गेल्या चार दिवसांपासून कामगारांना बैठकीत अडकून ठेवलंय.मोर्च्याचं सरकार म्हणून फडणवींसाकडे पाहिलं जातं. गेल्या चार वर्षात शेतकरी असेल किंवा मराठा, धनगर, ओबीसी अनेक जातीचे मोर्चे निघाले. मुंबईकरांनी मोकळेपणानं स्वागत केलं.. मुंबईने प्रत्येक मोर्चेकराचं स्वागत केलंय… मोर्चेकराची ना जात पाहिली, ना धर्म पाहिली.. मुंबई आलेल्या या मोर्चेकरांना या बेस्ट कामगारांनी आंदोलनापर्यत नेऊन सोडलंय आणि घरीदेखील सुखरूप पाठवलंय. आज याच मुंबईच्या बेस्ट कामगारांना तुमची गरज आहे…फक्त याच्या पाठीशी उभं राहा..यांना बाकी काही नकोय..पण कामगारांनाही डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावे लागेल,आज कामगारांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले आहेत, २०१९ च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या आंदोलनामागे कुठली राजकीय ताकद तर नाहीय ना? राजकीय ताकद आली की वाटाघाटी आल्या, जे गिरणी कामगारांचं झालं तेच या कामगारांचं होईल. ही एकजुट अशीच कायम राहिली तर कामगारांचा नेताही काही करू शकणार नाही..
– वैभव परब