मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबईत अनेक ठिकाणी राष्ट्रीय युवक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी दरवर्षी “राष्ट्रीय युवक दिन” साजरा केला जातो ज्यात अभाविपचे कार्यकर्ते देशभर स्वामी विवेकानंदांचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
विद्यार्थी परिषदेच्या ईशान्य मुंबई भागाने एल. जी. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विवेकानंदांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवला गेला. यावेळी प्राध्यापक डॉ. वरदराज बापट वक्ते म्हणून उपस्थित होते. सुमारे १२० विद्यार्थी व प्राध्यापक यावेळी उपस्थित राहिले. पश्चिम मुंबई भागाने “रणभूमी मॅरेथोन २०१९” आयोजित केली होती. ह्या मॅरेथोन स्पर्धेत सुमारे १८० विद्यार्थी सहभागी झाले. वसई भागाने “स्वामी फॉर यूथ” या विषयावर भाषण आयोजित केले होते. अभाविप मुंबई महानगर अध्यक्ष डॉ. कैलाश सोनमणकर वक्ते म्हणून या भाषणास उपस्थित राहिले. या भाषणात त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचे नानाविध पैलू उलगडत युवकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले. कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंदांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले ज्यात अभाविप मुंबई महानगर उपाध्यक्ष प्रा. उमेश शर्मा वक्ते म्हणून उपस्थित राहिले. विद्यानगरी भागाने वांद्रे स्टेशनबाहेर सायन हॉस्पिटलशी टाय-अप करून रक्तदान शिबीर आयोजित केले होते. दिवसभर चाललेल्या ह्या रक्तदान शिबिरात सुमारे ५० लोकांनी रक्तदान केले. पूर्व मुंबई भागाने “रन फॉर नेशन” मॅरेथोन स्पर्धेचे आयोजन केले ज्यात सुमारे ५५ स्पर्धक सहभागी झाले. मध्य मुंबई भागाने महर्षी दयानंद कॉलेजबाहेर स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी जीवनाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
“स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचे विचार, त्यांची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविणं ही राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी आजची गरज असून विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता एक आदर्श समाज घडविण्यासाठी कायम झटत राहील,” असे अभाविप मुंबई महानगर मंत्री अमेय महाडिक यांनी सांगितले.