हिवाळ्यामध्ये आरोग्य चांगलं राखण्यासाठी शरीराची फार काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये फळं, भाज्या आणि फळभाज्यांची बाजारामध्ये आवाक वाढते. एवढचं नाही तर तुम्हाला ताजी फळं आणि भाज्या सहज उपलब्ध होतात. यापासून तुम्ही अनेक आरोग्यदायी पदार्थ तयार करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मुरांबेही तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत थंडीमध्ये आरोग्यदायी ठरणाऱ्या काही मुरांब्यांबाबत….
१) आवळ्याचा मुरंबा
आवळ्याचा मुरांबा व्हिटॅमिन सी, आयर्न आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशिअम असतं. ज्यामुळे आवळ्याचा मुरांबा आरोग्यदायी पदार्थ म्हणून ओळखला जातो. याचे नियमित सेवन केल्यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते. आवळ्याचा मुरांबा दररोज सकाळी खाल्याने हाय-ब्लडप्रेशरमध्ये फायदा होतो. तसचे थकवा किंवा अशक्तपणा दूर होण्यासही मदत होते. शरीरामधील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठीही आवळ्याचा मुरांबा फायदेशीर ठरतो. याशिवाय अल्सर, बद्धकोष्ट आणि अॅसिडीटीसारख्या समस्यांवरही आवळ्याचा मुरांबा उपयोगी ठरतो.
२) सफरचंदाचा मुरंबा
सफरचंदाच्या मुरांब्यामध्ये फॉस्फोरस, आयर्न, प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहाइड्रेट, विटामिन बी आणि सी मुबलक प्रमाणात असते. यामधील पोषक तत्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते. तसेच स्मरणशक्तीतही वाढ होते. डोकोदुखी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही सफरचंदाचा मुरांबा फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला अनिद्रेची समस्या सतावत असेल तर हा मुरांबा खाल्याने तुमची समस्येपासून सुटका होण्यास मदत होईल.
३) गाजराचा मुरंबा
हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये गाजराची आवाक वाढते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ई आणि आयर्न मुबलक प्रमाणात असतं. यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतं. यामुळे अॅसिडीटी किंवा पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासही मदत होते. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, गाजराचा मुरांबा मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, डिप्रेशनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याच्या नियमित सेवनाने ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.