तिला घेऊन पहिल्यांदाच देवाच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. आजुबाजुला बरीच गर्दी झालेली. एकमेकांना रेटून लोक पुढे सरकत होते. आम्ही नारळ, हार घेतला आणि तिथेच चप्पल सोडली.
हात पाय धुण्यासाठी शेजारीच धबधब्यासारखं पाणी कोसळत होतं तिथे गेलो. जिन्स फोल्ड करुन ति पुढे गेली. गोरया पायातील पैंजन खळखळत्या पाण्यात अजुनच उजळून निघालं. तोंडावर पाणी मारताच तिच्या कानाच्या मागून पाण्याचे टपोरे थेंब हळू हळू ओघळू लागले. तिने ओले झालेले केस कानांच्या मागे सारले आणि ते टपोरे थेंब अलगद तिथेच विसावले. आय हाय !
चेहरा धुतला पण मैडमकड़े रुमालच नाही. केविलवाणा चेहरा करुन माझ्यासमोर हात पुढे करुन उभ्या राहिल्या. मी खिशातील रुमाल काढून हातावर ठेवला. चेहरा पुसून झाल्यानंतर म्हणते कशी, किती घाण झालाय तो रुमाल, धुवायला टाकत जा की. हे बरंय हिच, स्वतः रुमाल विसरायचा आणि टोमने मात्र मला मारायचे.
दर्शनासाठी आम्ही रांगेत थांबलो. मागून लोक अक्षरशः अंगावर पडत होते. मी तोल सावरत होतो तसा पण शेवटी बॅलन्स गेलाच आणि त्या नादात मी दोन्ही हातांनी तिच्या कंबरेला पकड़लं. तिने मागे वळून पाहिलं आणि म्हणते, तूला फक्त चांस हवा. देवाच्या दारात काहीही कसं सुचतं रे तूला.
मी आपला मान खाली घातली. चेहराच पडला माझा. तिच्या बहुतेक लक्षात आलं. तिने तिचा हात मागे सारला आणि हळूच माझा हात घट्ट पकडला. मंदिरातून बाहेर पडेपर्यंत तिने धरलेला हात सोडला नाही. माझा तोल जाताच हात घट्ट धरणारी हिच माझी बायको होईल हे मात्र मी त्यादिवशी मनाशी पक्क केलेलं…
– अभिनव बसवर