समाज म्हटला तर’ एक विशिष्ट समुदाय’ म्हणून व्याख्या प्रचलित आहे.ठराविक व्यक्ती विचारांनी एकत्रित आल्या तर समाज शब्द आपण त्यास संबोधतो.स्वतःपासूनच जर सुरू केले तर जाणत्या माणसास ते उमगेल.आपला जन्म झाल्यावर आपल्याला साभांळणारे आईवडील,तद्नंतर होत जाणा-या जगाच्या परिचयातून तयार होणारे वेगवेगळे संबंध.हे माणसास अनायासाने मिळून जातात.ज्याला हे मिळत नाही अशा मोगलीची सिरीयल्स आपण पाहिली असल्यास आपल्याला ते लवकर उमगेल.जगाच्या संबंधातुन मिळणारी स्थानपरत्वे भाषा,विविध सामाजिक संबंध मित्र,शत्रू,ग्राहक,नेता,नातेवाईक ही अशी घडणावळ माणसाच्या आयुष्यात सहजरीत्या विकसित होते.त्याच व्यक्तींच्या विशिष्ट समुदायालाच आपण मग समाज हा शब्द लावतो.
ह्याच समाजात विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकवेळी ज्याला आपण’ दुसरा’ समजतो,अशा व्यक्तीशी संबंध येतोच येतो.मग तो संबंध मित्र,शत्रू,ग्राहक,नेता,,
गुलाम,नोकर,व्यापारी,संत यापैंकी कुठलाही असु शकतो.बरेचश्या संबंधाबाबत वृत्तीसंघर्षही उभे राहतात.गीतेने तर त्याचेही वर्णन केले आहे,सुह्र्द-मित्र-अरि-उदासिन-मध्यस्थ-द्वेषी-बंधुशु-साधु.ह्या वर्णनातीत संघर्षात प्रत्येकालाच टिकायचय.आणि काहींना तर त्याही पुढे जाऊन नुसतं टिकायचं नाही तर स्वतःचा ठसाही उमटवायचाय.कैकजण ह्यात यशस्वी होतात,त्यांना आपण महापुरुष संबोधतो.पण इतकं खरं की,दुसरा मग तो कुणीही असो त्याच्याशी संबंध बांधण्याची वर्तनकला आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवते.कैकजणांना तर ह्या स्तरावर जाऊन विचार करतात,की दुस-यावर इतकं प्रेम करायचं,की त्यांना वाटलंच नाही पाहिजे,की मी दुसरा आहे,म्हणजे दुस-याचं दुसरंपणच काढायचं.अर्थात हे बोलणं जितकं कठिण तितकं ते प्रत्यक्षात अमलात आणणं महाकठिण.
माणसाचा स्वभावच असा विचित्र आहे की,भीतीचं काहूर त्याच्या डोक्यात तसेच पुर्वापार चालत आलेल्या मनात तळ ठोकून आहे.म्हणुनच माणुस गुपित राखतो,बेधडक होताना सतरा वेळा लोक काय म्हणतील,याचा विचार करतो,आपली कष्टाने घाम गाळुन कमावलेली संपत्ती पण अभिमानाने सांगत नाही,निवडणुक काळात आश्वासने जपुन देतो.सत्ताधारी वर्गाला विरोधकांची भीती तसेच विरोधकांना सत्ताधा-यांची भीती .हे सगळं का होतं,तर समाजाविषयी संबंध कायम शाबुत राहतील का याची एक अनामिक भीती.दुस-याविषयीची भीती मनामध्ये साचलेली असल्यावर भीतीच्या पायावर हे सर्व संबंध बांधताना त्या अमुक एका माणसाची काय दुर्दशा वा दमझाक होत असेल,ते देवच जाणे(ONLY GOD KNOWS).एखादा निर्भयी जरी असला तरी स्वार्थाधिष्ठित भुमिकेवरुन जर दुस-याशी संबंध बांधत असेल तर काही काळापुरतच ते मर्यादित असणार ,कारण कुठलीही व्यक्ती आयुष्यभरासाठी कायम कधीच स्वार्थाधिष्ठित नसते,म्हणुनच ठराविक काळापर्यंत यशस्वीता गाठलेली माणसे नंतर दानधर्माच्या(विद्यादान,देहदान,नेत्रदान,अवयव दान,अन्नदान) स्पर्धेसाठी उतरलेले आपल्याला दिसतात.जसं काही घेतलं पाहिजे,तसं काही घेतलेले सोडताही आले पाहिजे.प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हे करावे लागतेच.
साधी रोजची झोपसुद्धा विषय डोक्याबाहेर ठेवल्यानंतरच झोप येते,नाही आली झोप तर झोपेच्या म्हणजेच काही विसरण्याच्या गोळ्या माणसाला खाव्या लागतात.(काही विसरण्याचा आनंद काय असतो,तो एखाद्या बेवड्याला चांगलाच ठाऊक असला पाहिजे-एक शक्यता)कायम विषयचिंताच जर डोक्यात असेल तर पुरेशी गाढ झोपही येणार नाही.
समाज म्हटला अशी माणसे की जे सर्वसंबंध सर्वजणांशी,आपल्या सार्वजनीन आयुष्यात सुंदररित्या साधायचा निदान प्रयत्न करतात,मग ती कमी संख्येने का असेनात,खरा समाज तोच.शत्रुसंबंध सुंदर कसा बनवायचा,एक असाही प्रश्न आपल्याला पडेल?
महाराणा प्रतापांचा’ जोपर्यंत चित्तोड परत मिळवणार नाही,तोपर्यंत गवताच्या काडीवर झोपेल’ अकबराशी असलेला लढा,त्यासाठी दिलेला लढा सर्वज्ञात आहेच,किंवा’चाणक्याचा नंदसाम्राज्याप्रती असलेला संघर्ष तद्नंतर त्यांच्या आयुष्यातील प्रयत्न याला नक्कीच सर्वार्थाने महत्व आहे.शत्रुसंबंध असला तर त्याला बैठक शुद्ध आचारविचारांची व पवित्र हेतुची असली पाहिजे.
पारंपारिक गोष्टी तसेच सामाजिकीकरणातुन पुर्वापार चालत आलेले काही गुण ज्या आपल्याला मिळालेत त्या नीट समजुन घेऊन,त्यातल्या महत्वाच्या तत्वांशी कृतज्ञभाव ठेवला पाहिजे.तसेच केवळ भूतकाळालाच महत्व देत वास्तवाला झुकतं माप देणं,हेही सर्वथा अयोग्यच.वास्तवातल्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या,त्यांच्याशी सुद्धा सुंदर संबंध बांधलेच पाहिजेत.आणि भविष्याकडे वाटचाल करायची तर अशी की जे वास्तवातल्या वाटचालीत मिळालेत,जे सोबत आहेत,माझ्याकडुन नवीन पिढ्या काही आदर्श घेतील,असे संबंधही समाजात प्रस्थापित केले पाहिजेत,तरच आयुष्याला काही आकार आला असे म्हणता येईल……
-संतोष राजदेव.