माझ्या आजीचे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. मी व माझी मोठी आत्या तिला घरी घेऊन जात होतो. तशी आमची गाडी होती परंतु आजीला गाडीत प्रवास करताना मळमळतं म्हणून आम्ही ट्रेन ने जाण्याचा निर्णय घेतला़. दुपारची वेळ होती. विलेपार्ले होऊन आम्ही ट्रेन पकडली आणि फर्स्टक्लासच्या sofisticated आणि भावनाशून्य डब्यात आम्ही चढलो. आमच्या तीन पिढ्या एकत्र प्रवास करत होत्या आणि त्याही विविध पेहराव्यात. आजी कॉटनच्या नऊवारी लुगड्यात होती. आत्याने साधीशी साडी घातली होती आणि मी आधुनिक स्त्रीचे प्रतिनिधित्व करत होते. जीन्स आणि टी शर्ट मध्ये मी त्या फर्स्टक्लासच्या डब्यात स्वीकारले गेले होते. जिथे जागा मिळेल तिथे आम्ही बसलो.
माझ्या आजीकडे काही लोकांनी कुत्सित नजरेने पाहिलं. तिथे तिचे लुगड्यात असणं हे त्या फर्स्टक्लासच्या कंपार्टमेंटमध्ये कदाचित मान्य नव्हतं. मी सगळ्यांच्या नजरेतला प्रश्न वाचत होते.एका हाय क्लास बाईने ( ते स्वतःला तिनेच समजलेलं) चक्क माझ्या आजीला इंग्लिश मध्ये विचारलं ” Do you have proper ticket to travel in first class compartment? ” माझी आजी गोंधळीच आणि तिने आत्या कडे पाहिलं. आत्याने त्या व्यक्तीला मराठीतच उचित उत्तर दिलं, पण एक प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्या व्यक्तीने हाच प्रश्न मला किंवा आत्याला का केला नाही? कदाचित आमचा पेहराव त्या बनावटी विचारांच्या लोकांना पटला असेल. आजच्या स्त्रीचे विचार, व्यक्तिमत्त्व ,पेहराव सगळंच बदललेल आहे पण याचा अर्थ हा होत नाही की लुगडं घातलेली बाई ही मागास विचारांची आहे. मला आठवतं जेव्हा मी अभिनय क्षेत्राकडे वळले तेव्हा माझ्या आजीने व आत्याने मला खूप प्रोत्साहन दिले होते. अभिनय क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मागासलेला कधीच नव्हता. पण तेच आजच्या युगातल्या बऱ्याच जणांनी नाकं मुरडली होती. मला नावे ठेवण्यात हे आधुनिक पुढारीही मागे नव्हते.
एका सिरियल मध्ये माझ्या लग्नाचा सीन छायांकित केला गेलेला होता आणि टीव्हीवर खूप जणांनी तो पाहिला. एक गावची बाई (आजच्याच युगातली ) धावत आजीकडे आली आणि तिला सांगितलं तारी नातनी लगन करवाशी लागीत (तुझी नात लग्न करतेय) आजीही अचंबित होऊन म्हणाली “कुठे?” “टीव्हीवर” ती उत्तरली. आजीला हसूच आले आणि त्या स्त्रीची समजुत काढून तिची पाठवणी केली.
मध्यंतरी “अनाथांची माय, सिंधुताई सपकाळ यांच्याशी भेटण्याचा योग आला. त्यांचे लुगडी नेसलेलं व्यक्तिमत्त्व खूपच खुलून दिसत होतं. त्यांचे विचार हे आधुनिक स्त्रीच्या विचारा एवढेच प्रबळ होते. त्यातर लुगडं नेसून कित्येक देश फिरून आल्या आहेत. सगळ्यात बेस्ट, नऊवारी श्रेष्ठ हे वाक्य खरंच समर्पक वाटतं. स्त्रीचे आधुनिकीकरण हे तिच्या वयावर किंवा पेहराव्यावर अवलंबून न राहता तिच्या विचारांवर व निर्णयक्षमतेवर आकारले जायला हवं.एक वयोवृद्ध स्त्री ही आधुनिक होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजेच माई अर्थातच सिंधुताई सपकाळ.त्यांच्याबद्दल ही खूप काही बोलायचं आहे , लिहायचचं आहे पण ते पुढच्या लेखात…….
– नेहांकी संखे