आपला समाज हा पुरुष प्रधान समाज आहे कितीही म्हटलं, स्त्री-पुरुष एक समान आहेत तरी ते एकसमान नाही याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येतो. उदाहरण द्यायचं झालं तर स्त्री-पुरुष यांच्या चारित्र्य मापनाबाबत बोलूया. स्त्री-पुरुषाचे चारित्र्य आकलन करण्याची पातळी या समाजाची नेहमीच वेगळी आहे.पुरुषांना मुजोरी आणि मनमानी करण्याची परवानगी हा समाज वेळोवेळी देत असतो पण स्त्रीचे चारित्र्य हे तिच्या शरीराच्या 2 इंच भागावर मापल जातं. एका स्त्रीचे विचार, स्वभाव, कर्तृत्वापेक्षा तिच्या पावित्र्याला जास्त समाजात मान मिळतो. आपल्या समाजात “व्हाईटबेडशीट” ही प्रथा खूप पूर्वीपासून रुजू झालेली आहे. सासरची माणसं वराला लग्नाच्या पहिल्या रात्री सफेद चादर देतात आणि सफेद चादर वर पडलेले लाल डाग हे त्या स्त्रीचं पावित्र्य दर्शवतात. धावपळीच्या ,ताण-तणावाच्या युुगात आणि व्यायामामुळे कदाचित सफेद चादरीवर ते लाल डाग पडणारही नाहीत म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ती पवित्र नाही.
मुलीच्या जीवनात लग्न म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवातच. साताऱ्याची ममता लग्न करून मुंबईसारख्या ठिकाणी आली होती. मुंबई बद्दल तिला नेहमीच आकर्षण होतं. ममता आधुनिक विचारांची होती. लग्नाच्या पहिल्या रात्री सासरच्या मंडळींनी तिची खोली खूपच सुरेख सजवली होती, पण बिछान्यावर व्हाईट बेडशीट टाकायला मात्र ते विसरले नव्हते. पहाटे पाच वाजता कोणीतरी तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. नवरयाने ती व्हाईट बेडशीट गुंडाळून त्या व्यक्तीच्या हवाली केली. ममता हे सगळं निशब्द होऊन पहात होती. तिला संशयाच्या जाळ्यात अडकल्या सारखं वाटत होत. नवरया मुलीचं कौतुक करणारी सासर मंडळी आज तिच्याशी फटकून वागत होते. नवीन संसाराचे स्वप्न सगळी धूसर होत होती. तिच्या प्रेमावर , तिच्या संसारावर सासरच्या मंडळींच्या भुरसटलेल्या विचारांची व्हाईट बेडशीट पांघरली गेली होती.
देशात बलात्काराच्या घटना आता पदोपदी दृष्टिक्षेपात पडतात. शारीरिक बलात्कार सहन केलेली स्त्री ही समाजाने केलेल्या मानसिक बलात्काराने अजून खचली जाते. स्त्रीच्या चरित्र बाबतच हा समाज एवढा कठोर का? समाजाचे स्त्रीच्या चारित्र्य आकलनाबाबतचे विचार कधी बदलणार आहेत?
स्त्रीच्या जीवनात असलेली ही व्हाईट बेडशीट कधी संपुष्टात येणार नाही हे तर नक्कीच. पण त्यावर तुमचे संशयारुपी लाल डाग पडू देऊ नका.
– नेहांकी संखे