चारित्र्य निर्मितीद्वारे बदलू स्वतःला, रचना आणि संघर्षातून घडवू नवभारताला हे ब्रीदवाक्य घेऊन कार्य करणाऱ्या स्नेहालय संस्थेचे अनेक पैलू बदलापूरकरांनी डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या माध्यमातून स्मृतीगंध या कार्यक्रमात जाणून घेतले. लालबत्ती भागात काम करत असतांना स्नेहालयाचा संघर्ष ते नवभारताची निर्मितीचा संपूर्ण प्रवास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी बदलापूरकरांसमोर उलगडला. सत्कर्म परिवार बदलापूर आयोजित मुक्तसंवाद कार्यक्रमात संवाद साधतांना त्यांनी स्नेहालयाची माहिती उपस्थितांना यावेळीं दिली. देशांची सेवा म्हणजेच देहव्यापारात अडकलेल्या स्त्रिया व मुलांची सेवा, वंचित, उपेक्षितामधील जिवंत परमेश्वराची सेवा हीच भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोत्तम ईश्वरसेवा मानली जाते प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा सेवा करणारे आणि सहयोग देणारे हात नेहमीच ईश्वराला अधिक प्रिय असतात आणि अशा हातांच्या सहकार्याने आणि सहयोगाने स्नेहालयचे काम सुरु असल्याचे डॉक्टर कुलकर्णी यांनी यावेळीं सांगितले. सामाजिक जाणीव कृतीतून व्यक्त करता येते आणि माणसाला आयुष्य आणि तारुण्य एकदाच मिळते त्यामुळे निडर होऊन प्रत्येकाने पुढे आला पाहिजे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाला स्नेहालयने आपल्या कामासोबत जोडून घेतले आहे.
गांधी- विवेकानंद- आंबेडकर यांच्या जगण्यातील समान धागा हाच आहे की त्यांनी देशातील गरीब माणसाची समज आणि दानत यावर विश्वास ठेवला आणि याचं ज्योत से ज्योत जगाते चलो पद्धतीने आमचा प्रवास सुरू आहे असेही ते यावेळीं म्हणाले. या कार्यक्रमात समाजातील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या उद्देशाने युवकांचे समाजभान अंतर्गत अविनाश पाटील यांच्या टीम परिवर्तनच्या माध्यमाने चालणाऱ्या विविध उपक्रम तसेच खिळेमुक्त झाडे आणि अंघोळीची गोळी आणि सचिन आशा सुभाष यांच्या समाजबंध संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक आणि पुनर्वापर होणाऱ्या आशा सॅनिटरी पॅडची माहिती उपस्थितांना देण्यात आली तसेच मासिक पाळी आणि लैंगिक समस्या या विषयावर गावोगावी जाऊन कार्य करणाऱ्या सचिन आशा सुभाष ह्या युवा कार्यकर्त्यांच्या कार्याचा परिचय देखील यावेळीं करून देण्यात आला. कार्यक्रमात बेडीसगाव, वांगणी आदिवासी भागात कार्य करणाऱ्या साद फाउंडेशन या संस्थेस सत्कर्म परिवारातर्फे अल्प अर्थ सहाय्य देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्कार परिवाराचे संजीव साळी यांनी तर आभार प्रदर्शन विकास वखारे यांनी केले.