बुलडाणा | जम्मू व कश्मीर राज्यातील पुलवामा येथे काल गुरुवार दि 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यातील एका वाहनावर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात जिल्ह्यातील दोन सुपूत्र शहीद झाले आहेत. मलकापूर येथील संजय राजपूत (वय 45) व लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड (वय 37) यांचा या हल्ल्यात समावेश हाेता.
लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धन नगर तांड्यातील नितीन शिवाजी राठोड भारत मातेच्या संरक्षणार्थ धारातिर्थी पडले. नितीन हे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन बटालियन मध्ये 2006 ला आसाम मध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी दुसरबीड येथे पूर्ण केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीन यांना लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती वंदना शिवाजी राठोड (वय 30), मुलगा चि. जीवन (वय 10) व मुलगी कु. जीविका (वय 5), आई सौ सावित्रीबाई (वय 53), वडील शिवाजी रामू राठोड (वय 58), दोन बहीण आणि एक भाऊ प्रवीण राठोड (वय 32) असा परिवार आहे. खेळ, व्यायाम करणे याचबरोबर या गावातील तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत्त करण्याचे काम नितीन हे सुट्टीवर आल्यावर करायचे. ते गावकऱ्यांशी अगदी प्रेमाने वागायचे. स्वभावाने मनमिळावु असलेले नितीन सर्व गावकऱ्यांने आपल्याच कुटुंबातील असल्याचे वाटायचे. सुटीवर आल्यावर गावातील सर्वच लहान थोरांना ते आवर्जून भेटायचे. नितीन हे चार दिवसांपूर्वी आपली 50 दिवसांची सुट्टी घालवून 11 फेब्रुवारीला आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते.
तसेच मलकापूर येथील वार्ड नं. 21, लखानी प्लॉटमध्ये लहानाचे मोठे झालेले शहीद जवान संजय भिकमसिंग राजपूत यांनी 1996 मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले होते. ते सीआरपीएफच्या 115 बटालीयनमध्ये कार्यरत होते. त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली. संजय यांनी 11 वर्ष देशसेवा केल्यानंतर त्यांनी पुन्हा 5 वर्षे सेवा वाढवून घेतली. काल जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या भ्याड हल्ल्याचे वृत्त मलकापुरमध्ये पोहोचताच शहरात शोककळा पसरली.
संजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मलकापूर येथे झाले असून अकरावी व बारावी जनता कॉलेजमध्ये पूर्ण केली. मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत यांना जय (वय 13) व शुभम (वय 11) ही दोन मुले असून पत्नी सुषमा (वय 38) नागपूर येथे कुटुंबासमवेत राहत आहेत. आई जिजाबाई (वय 70) वर्ष मलकापूर येथे वास्तव्यास आहे. संजय यांना चार भाऊ व एक बहीण आहे. त्यांच्या वडीलांचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. संजय 10 फेब्रुवारीला मलकापूरवरून आईची व मित्रांची भेट घेऊन जम्मूकडे रवाना झाले होते. त्यांची ही शेवटचीच भेट ठरली आहे. या दोन्ही वीर सुपूत्रांवर दिनांक 16 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.