कल्याण शुन्य कचरा संकलन मोहीमेच्या माध्यमातून महिन्यातुन एकदा अनुक्रमे कल्याण आणि डोंबिवली शहरांतील नागरिकांकडून त्यांच्याकडे असलेले जुने साहित्य संकलित केले जाते. जुने कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य, बॅग, इलेक्ट्रॉनिक वस्तु, प्लास्टिक, चपला आणि बूट मोठ्या प्रमाणात या मोहिमेत जमा होत असतात. जमलेल्या साहित्याची वयोगट आणि आकारानुसार विभागणी केली जाते आणि दुर्गम भागांतील गरजु लोकांना हे साहित्य वाटले जाते. नुकतेच या मोहिमेच्या माध्यमाने जमा झालेले साहित्य करंजोटी, पडघा येथील वीटभट्यावर वाटण्यात आले. कैलास आणि सुखदा देशपांडे यांच्या पुढाकाराने चालणारी ही मोहीम गेल्या दिड वर्षापासुन सुरू आहे. या मोहिमेत जमा झालेल्या प्लास्टिकच्या वस्तु रिसायकलिंगसाठी पुण्यात पाठवण्यात येतात तर कपड्यांच्या कापडी पिशव्या बनवल्या जातात. इतर उपयोगात नसलेल्या कापडापासून विविध उपयोगी वस्तू बनवल्या जातात. या मोहिमेच्या माध्यमाने जमा होणारे साहित्य विविध सामाजिक संस्थांना दिले जाते. नागरिकांनी आपल्याकडील जुने साहित्य त्याचबरोबर प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्य नियोजन करावे पर्यावरणपुरक जीवनशैली अमलात आणावी यांसाठी कल्याण शून्य कचरा संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोहिमेच्या माध्यमाने जमा होणारे साहित्य अनेकांना उपयोगी ठरत आहे शैक्षणिक साहित्य आणि कपड्यामुळे अनेकांच्या गरजा पुर्ण होत आहेत टीम परिवर्तन हा आमचा युवकांचा गट यापुढेही अनेक गरजु वस्ती पाड्यात ही वाटप मोहीम चालु ठेवणार आहे युवकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळीं टीम परिवर्तनच्या अनिकेत चांदुरे याने केले. मोहिमेत आलेला एक संगणक आणि टिव्ही यावेळीं दहागाव, वासिंद येथील देसलेपाड्याच्या शाळेत देण्यात आला. राजे फ्रेंड्स ग्रुपचे भुषण ठाकरे, राकेश दिनकर, चेतन भोईर तसेच टीम परिवर्तनचे अविनाश पाटील, सागर वाळके या युवकांनी मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. आजही आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक पाड्यात मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत आम्हीं युवक मुंबई ठाणे परिसरात युवकांचे आणि संस्था संघटनांचे एक व्यासपीठ तयार करून हे काम करण्याचा प्रयत्न यापुढेंही करणार आहोत असे टीम परिवर्तनचे अविनाश पाटीलने यावेळीं सांगितले.