मुंबई : राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत.
तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल. याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.