मुंबई : आधीच मालिका खिशात घातलेला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बाजी मारुन ३-० असा ‘क्लीन स्वीप’करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ६६ धावांनी धूळ चारल्यानंतर दुसºया एकदिवसीय सामन्यात ७ बळींनी पराभूत केले होते. या जोरावर भारताने आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये ४ गुणांची कमाई केली. भारताला याचा लाभ २०२१ च्या विश्वचषकाची थेट पात्रता मिळविण्यासाठी होऊ शकतो.
प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनात भारत विजयी मार्गावर परतला असून सलामीवीर स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अनुभवी मितालीने दोन सामन्यात अनुक्रमे ४४ व ४७ धावा केल्या. पूनम राऊतनेही मधल्या फळीत योगदान दिले असून जेमिमा रॉड्रिग्जचे मोलाचे योगदान राहिले. दीप्ती शर्मा, मोना मेश्राम व यष्टिरक्षक तानिया भाटिया यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूनम यादव व एकता बिश्त यांनी जबाबदारी चोखपणे बजावली आहे.