दिल्लीत एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 सालासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ पुरस्कारांचे वितरण केले गेले. केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी मध्यप्रदेशाच्या इंदूर (ऊर्फ इंदौर) या शहराला राष्ट्रीय यादीत एकूणच प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तृतीय कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.
स्वच्छ भारत मोहीम (शहरी) या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत केले जाणारे स्वच्छ सर्वेक्षण हा गृह मंत्रालय आणि शहरी कल्याण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2014 रोजी मोहिमेची सुरूवात केली गेली. आज स्वच्छ भारत मोहिमेला एका देशव्यापी चळवळीचे स्वरुप देण्यात आले आहे. ही मोहीम शहरी आणि ग्रामीण अश्या दोन्ही विभागांमध्ये राबवली जात आहे.