केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 27 फेब्रुवारी, 2019 रोजी नवीन पदवीधारकांना उद्योग प्रशिक्षणासाठी किंवा प्रशिक्षण संधी प्रदान करण्यासाठी Scheme for Higher Education Youth in Apprenticeship and Skills (SHREYAS) योजना सुरू केली. मुख्यत्वे बीए, बीएससी आणि बीकॉमच्या विद्यार्थ्यांना कौशल्य-तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये बीए, बीएससी, आणि बीकॉम (प्रोफेशनल) अभ्यासक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे.
एप्रिल-मे 2019 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येईल. नॅशनल अपरेंटिसशिप प्रमोशनल स्कीम (एनएपीएस) आणि नॅशनल करियर सर्व्हिस (एनसीएस) द्वारे ‘ऑन द जॉब वर्क एक्सपोजर’ देऊन भारतीय तरुणांच्या रोजगाराच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणे या योजनेचा उद्देश आहे. श्रेयस योजना ही मानव संसाधन विकास मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि श्रम आणि रोजगार मंत्रालयासह तीन केंद्रीय मंत्रालये या उपक्रमाचा समावेश आहे.
योजनेअंतर्गत, केंद्र सरकार प्रति महिना 25% हिस्सा (जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति महिना) अनुज्ञेय देईल. त्याशिवाय आवश्यक असलेल्या मूलभूत प्रशिक्षण खर्चासाठी 7500 पर्यंतची रक्कम देण्यात येईल. 2022 पर्यंत 50 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे लक्ष आहे.