इतिहासात पहिल्यांदाच, दिनांक 29 मार्च 2019 रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेनी आपल्या दोन महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ (अंतराळात यानाशिवाय भ्रमण करणे) आयोजित करण्याचे ठरविले आहे. या मोहिमेदरम्यान अॅनी मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळात भ्रमण करणार आहेत. ही मोहीम कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) याच्या फ्लाइट कंट्रोलर क्रिस्टन फॅसिओल यांच्याकडून व्यवस्थापित केली जाणार आहे. या मोहिमेत निक हेग देखील सामील होतील.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे आधीपासूनच नियोजित असलेल्या तीन स्पेसवॉकच्या शृंखलेतली ही द्वितीय मोहीम आहे. 29 मार्चला आयोजित करण्यात आलेला हा स्पेसवॉक सात तास चालणार आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. ISS वर सध्या अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.