देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
साधं राहणीमान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशके आपला दबदबा राखला. वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात पर्रिकर यांनी मात्र आपल्या कुशल नेतृत्वाने ही अस्थिरता संपुष्टात आणली. मुख्यमंत्री म्हणून पर्रिकर यांनी गोव्याला यशस्वी नेतृत्व दिलं.
गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा त्यांना बहुमान मिळाला. २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ ते निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता. त्यानंतर २०१४ मध्ये देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले. दरम्यान, २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपने पर्रिकर यांच्या नेतृत्वाची चाल खेळत राज्यातील सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज अपयशी
मनोहर पर्रिकर गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. गोवा मेडिकल कॉलेज, मुंबईतील लीलावती रुग्णालय, दिल्लीतील एम्स रुग्णालय तसेच अमेरिकेतही पर्रिकर यांनी उपचार घेतले. मात्र, पर्रिकर यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होता. एकीकडे कॅन्सरशी लढा देत असताना त्याच अवस्थेत पर्रिकर यांनी राज्याचा गाडाही सक्षमपणे हाकला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा वाहिली.