ठाणे | पडघा येथील करंजोटी या गावांत नुकताच टीम परिवर्तन या युवकांच्या गटाच्या प्रयत्नांतून अनोखा दंतचिकित्सा कार्यक्रम घेण्यात आला. कल्याण येथील दंत चिकित्सक नेहा डोंगरे खडकबाण आणि धनश्री थोरात यांनी यावेळीं जमलेल्या सर्व मुलांची आणि गावकऱ्यांची दातांची तपासणी केली. लहान मुलांनी प्रामुख्याने आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी, दिवसांतून किती वेळा दात घासावेत आणि कशा पद्धतीने घासावेत यांची प्रात्यक्षिके यावेळीं मुलांना समजावून सांगितले. या दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन टीम परिवर्तनच्या माध्यमाने करण्यात आले होते. टीम परिवर्तनचे भुषण राजेशिर्के, अविनाश पाटील यावेळीं उपस्थित होते.
यावेळीं १०० पेक्षा अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आणि त्याचबरोबर सर्वांना मोफत पेस्ट आणि ब्रशचे वाटप करण्यात आले. दात घासण्यासाठी मुलांनी ब्रश आणि पेस्टशिवाय इतर कोणत्याही साहित्याचा वापर करू नये हा सल्ला देखील उपस्थित मंडळींना यावेळीं देण्यात आला. मुलुंड येथील ज्योती जोशी यांच्या ग्रुपच्या माध्यमाने सर्व उपस्थित लोकांना यावेळीं स्वछतेसाठी आवश्यक गोष्टी देण्यात आल्या. दंतचिकित्सा शिबिरासाठी लागणारे साहित्य देखील त्यांच्याच मदतीने उपलब्ध झाले. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना मौखिक स्वच्छता आणि चांगल्या आरोग्यासाठी दातांची निगा राखणे का गरजेचे आहे यांची माहिती देखील धनश्री थोरात यांनी यावेळीं उपस्थितांना दिली. करंजोटी येथील राजे फ्रेंड्स ग्रुपचे विशेष सहकार्य या दंतचिकित्सा शिबिरासाठी लाभले. मौखिक आरोग्याची काळजी घेणे का आवश्यक आहे यांची माहिती आजच्या शिबिरात आमच्या ग्रामस्थ मंडळींना मिळाली त्यांचा निश्चित त्यांना फायदा होईल असे शरद ठाकरे यांनी यावेळीं सांगितले.