एक गुलाब जामुन खाल्ला…
एक आइसक्रीम खाल्लं…
एक कॅडबरी खाल्ली…
उकाड्यात 300ml थंड अशी पेप्सी पिली…
दिवाळीचा मस्त गोड आणि तळलेला फराळ खाल्ला… गरमागरम भजी, वडापाव, समोशावर ताव मारला…वरील पदार्थ कोणाला नको असतील असा माणूस विरळाच. पण हेच पदार्थ हळूहळू तुमच्या पदरात वजनवाढीचं दान टाकत राहतात.ज्यावेळी असे गोड, तळलेले पदार्थ व आवडते पदार्थ आपण खातो त्यावेळी जिभेवर हे पदार्थ पोचताच मेंदूत डोपामीनच प्रमाण वाढत, जे आपल्याला खुप छान, भारी वाटायला मदत करत. त्याबरोबर यात असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅलरी शरीराला ऊर्जा देतात म्हणजे पावर येते अंगात. मग इतकं सगळं छान वाटत असताना त्या गोष्टी कशासाठी टाळायच्या. कारण अशा खाण्याने लगेच काहीच परिणाम होणार नसतो किंवा कोणताही त्रास होणार नसतो, मग ज्या गोष्टीचा त्रास सध्या नाही मग त्याची आता काळजी करून काय फायदा? माणूस हा नेहमी कोणत्याही गोष्टीचा भविष्याच्या दृष्टीने विचार करत नाही, जे आहे ते करून घ्या, खा, प्या, ऐश करा अशी आपली वृत्ती मात्र ज्यावेळी आपलं शरीरच आपल्याला साथ देत नाही त्यावेळी मात्र विचित्र अनुभव देऊन जाते.
जास्त चरबीयुक्त आहार व गोड खाण्याचं व्यसन आपल्याला जाड होण्यासाठी कारणीभूत असत हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीही अस खाण आपल्याला कमी का करता येत नाही याबद्दल थोडं जाणून घेऊ या. लहानपणापासून आपण काय खावं, कस खावं व किती खावं याबद्दल चे संस्कार कधीच आपल्यावर झालेले नसतात. चांगला गुबगुबीत बाळ असला तरी त्याच्या आईला तो लुकडा सुकडा व काहीही न खाणारा वाटतो. पंगतीला बसलं तर आपण म्हणतो, “लाजू नका भरपूर जेवा”. सणावाराला व कार्यक्रमाच्या ठिकाणी गोड आणि तळलेल्या पदार्थांची नुसती रेलचेल असते. त्याचा तो तोंडाला पाणी आणणारा सुगंध आला की आपलं भान विसरून आपण तुटुन पडतो खाण्यावर. हे खाणं मेंदूला अप्रतिम अशा आनंदाची अनुभूती देत असत ज्याचा परिणाम म्हणून आपण खातच जातो,स्वतःला रोखत नाही.
शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा लागते, ती ऊर्जा आपल्याला आहारातून मिळत असते पण आपण किती खावं म्हणजे आपली गरज पूर्ण होईल हे आपण कधीच ठरवत नसतो. वेगवेगळ्या पदार्थाच वेगवेगळे कॅलरीमुल्य असत, पण याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. याशिवाय आपल्याला बऱ्याच वेळा जिभेचे चोचले पुरवणारेच पदार्थ आवडतात त्यामुळे चांगलं वाईट काय आहे याबद्दल आपण काळजी करत नाही. जी माणस जाड झालेली असतात ती पूर्णतः अन्नाच्या आहारी गेलेली असतात म्हणजे व्यसनच जडलेलं असत जस दारूचं जडत तस. 2-4 तास काही खाल्लं नाही की मग रक्तातील साखर कमी होते आणि लगेच काही तरी खाण्याची इच्छा जागृत होते. खाल्लं की मग आनंद मिळतो, अस न संपणार अन्नाच्या व्यसनाच चक्र आपल्याला आणखी जाड करत जात.
Ghrelin व Leptin ही दोन संप्रेरक आपली भुक नियंत्रित करण्यात मदत करतात, ज्यावेळी वजन वाढत त्यावेळी अतिरिक्त चरबी ही या संप्रेरकांच्या कार्यात बाधा आणायला सुरुवात करते ज्याचा परिणाम म्हणून खाण्याचं प्रमाण उत्तरोत्तर वाढत जात आणि वजनही वाढत जात. तसेच थायरॉईड या ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या संप्रेरकांच्या कमतरतेमुळेही वजन उत्तरोत्तर वाढत जात. याशिवाय आपल्या “जीन्स” म्हणजेच अनुवंशिकता देखील काही प्रमाणात जाड होण्याला कारणीभूत आहे. जस की जर एखाद्याचे आई वडील दोघेही जाड असतील अशा प्रत्येक मुलाचे इतर मुलांपेक्षा जाड होण्याचे चान्सेस चार पटीने वाढतात.
– डॉ.कृष्णा सुभाष सपाटे