या देशामध्ये माझा जन्म झाल्याचा मला नितांत अभिमान आहे. मला दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने अनुभव संपन्न होतो. माझ्या जन्मापासून आणि मला कळते तेव्हा पासून अश्या काही गोष्टी फार पक्क्या मनावर बिंबल्या गेल्या आहेत ज्या मुळे प्रत्येकवेळी मला त्या गोष्टींची आठवण येते आणि माझे मन प्रफुल्लित होते. कदाचित एक वेगळ्या प्रकारची चमक माझ्या चेहऱ्यावर येत असेल असे काही आठवल्या वर. परवा एक हातांच्या रेषा जानणाऱ्या व्यक्तीने माझा हात पाहिला. त्याने पाहून संगत खूप चांगली आहे तुझी असे सांगितले. त्यावेळी मला माझाच खूप हेवा वाटला. हाताच्या रेषांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा आपला आपला विषय आहे. पण मला माझा हात वाचून कोणी सकारात्मक भविष्य सांगितले तर माझा विश्वास बसतो. हं तर विषय होता संगतीचा; आणि त्या जाणकार व्यक्तीला मला होकार द्यावाच लागला कारण माझी संगत पहिल्यापासूनच चांगली राहिली आहे! आपण वाचक लोक माझ्या संगतीत आहात हाच त्यांचा चांगला पुरावा. याच विषयाला पुढे घेऊन जात आता माझे जन्मनक्षत्र, जन्माच्या वेळी ग्रहस्थिती पाहण्याचे कुतूहल वाढले आहे. फार सकारात्मक आहे असे वाटायला लागलंय.
मी साधारणतः 6 -7 वर्षांचा असताना आई मला न्हाऊ घालून तयार वगैरे करून अंगणात खेळायला सोडायची म्हणे. तेव्हा माझे सर्व आजू बाजूच्या परिस्थिती वर बारीक लक्ष असायचे असे मला लहानपणापासून प्रेमाने सांभाळणारे आमचे डॉक्टर काका म्हणतात. गावाच्या वेशीवर म्हसोबा असतो त्याला गावातल्या सर्व गोष्टीची माहिती असते असा विश्वास आहे. मुलगा जन्माला आला की त्याला म्हसोबच्या चरणी ठेवले जाते त्याचे भविष्य तो लिहितो असाही विश्वास आहे. काही ठिकाणी त्याला सटवाई म्हणतात. असा मी देखील म्हसोबा आहे असे त्या डॉक्टर काकांना वाटायचे. कोण कुठे गेले, कधी गेले, कोणाच्या घरी सकाळी काय झाले हे मला माहीत असायचे. याचा माझ्यावर सकारात्मक परिणाम झाला. माझ्या घरामध्ये असलेले प्राणी प्रेम ,वृक्ष प्रेम आणि एक उद्यमिता मला नेहमीच उपयोगाला आली आहे आणि त्यातूनच मी शिकलोय.
भारतीय तत्वचिंतनात व्यष्टी, समेष्टी, परमेष्टी ला एकाच सूत्रात बांधले आहे हा संस्कार नकळत घरातून मला भेटत गेला. हे येवढं तत्वज्ञान वाचले असेलच घरच्यांनी असे नाही पण मला नकळत त्याचे संस्कार तर भेटत गेले. घरामध्ये उपलब्ध सुविधांमध्येच आपण समाजाला सुद्धा काही दिले पाहिजे हा त्यातला संस्कार कसलाही उहापोह न करता माझ्यावर झाला, आणि हा संस्कार असतो हे ही आज काल समजायला लागले. माझ्या आजूबाजूला उपलब्ध व्यक्तींनी, प्राण्यांनी, निसर्गाने मला खूप शिकवले. समरसता हा शब्द विद्यार्थी परिषदेचे कार्य करायला लागल्यावर मला समजला परंतु त्या शब्दाचे आणि भावाचे आचरण तर आपण घरात करतोच आहोत असे खूप वेळा वाटून गेले. त्यामुळेच कदाचित ती संकल्पना लवकर पचली देखील. एकदा आम्ही संभाजीनगर मध्ये जेथे राहत होतो तेथे निचरा नलिकेचे काम चालू होते. त्या नलीके मध्ये उतरून त्यातील कचरा, अडकलेले मनुष्य उत्सर्जित द्रव्य काही व्यक्ती साफ करत होते. दुपार झाली भोजनाची वेळ झाली आणि मी नेहमी प्रमाणे बाहेर त्यांचे निरीक्षण करत होतो. उन्हात निचरा नलिकेच्या उग्र दुर्गंधीत कार्य करून भोजन करायला त्या दोन कामगारांनी सुट्टी घेतली आणि नकळत मला त्यांच्या बद्दल अनुकंपा उत्पन्न झाली आणि मी त्यांना म्हटलो “आमच्या अंगणात या तुमचा डब्बा खायला, सावली आहे ” ते आले. मी ते त्यांची क्षुधा शांती कशी करतात हे कुतूहलाने पाहत होतो. हे सर्व मी आईला न विचारता केले होते. आई घरामध्ये होती. त्या कामगारांनी माझ्या कडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली. मी आतून फ्रीज मधले थंड पाणी आणून दिले. पाण्याची बाटली आणून देत असताना आईने पाहिले आणि तेव्हा तिला समजले की बाहेर काय चालू आहे ते. ती तेव्हा माझ्या कडे पाहून फक्त हसली. मला तेव्हा काहीही समजले नाही. मी सुद्धा मला जे वाटले ते केले. नंतर जसा जसा मोठा होत गेलो तसतसे मला आईच्या त्या हस्यांचे गमक समजत गेले. मला उन्हातुन तहानलेले होऊन आल्यावर जसे थंड पाणी प्यावे वाटते तीच भावना नकळत माझ्या मनात त्या कामगारांबद्दल निर्माण झाली आणि मी केलेल्या त्या कृत्याला स्मित हास्याने शाब्बासकी दिली यातच सर्व आले. मला त्या कामगारांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती हे अगदी नैसर्गिक आहे पण माझ्या भावनेला वृध्दीन्गत करण्यासाठी आईने केलेलं स्मित आजच्या काळात अधिक महत्वाचे.
आज आपल्या मुलाचे मित्र कोण असावेत, कोणत्या आर्थिक गटातील असावेत, त्याने त्यांच्याशी किती, काय, कसे खेळावे, कश्या प्रकारच्या पार्ट्यांमध्ये जावे हे सर्व नियमन करणाऱ्या आयांच्या समोर माझी आई तशी फारच सुमार आहे. पण आज मला त्याच आईचे खूप कौतुक वाटते. आपल्याला आपल्या सोबत जगणाऱ्या समाजाला घेऊन समन्वयाने जगायचे असते हाच खरा जिवशास्त्राचा नियम आहे. मला जिवशास्त्राच्या सिद्धांतात डार्विन चा struggle for existence चा सिद्धांत त्यामुळे नेहमीच चुकीचा वाटतो. भारतीय धर्म तत्वज्ञानात नेहमीच समन्वयाचे कालसुसंगत पुरावे पाहायला भेटले आहेत. या सर्व गोष्टी लौकिक दृष्ट्या काहीही माहीत नसलेल्या माझ्या आईने मला आचरणातून आणि माझ्या मानसिकतेचा अभ्यास करून अचरणातून शिकवल्या याचाच मला जास्त अभिमान आहे. आज काल “मी लाभार्थी…” असे म्हणून नकारात्मक गोष्टी पुढे आणल्या जात आहेत, पण मी खऱ्या अर्थाने लाभार्थी कारण मी भारतात जन्मलो आणि अश्या वातावरणात वाढलो…..(क्रमशः)
– यदुनाथ देशपांडे