रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 29 मार्च पासून सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांना आणि पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर 0.50 पैशांची सवलत देण्यात येणार आहे. रेल विकास निगम ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून रेल्वे मंत्रालयच्या अंतर्गत काम करते.
आयपीओच्या माध्यमातून 25 कोटी 34 लाख 57 हजार 280 शेअरची विक्री करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 780 शेअरसाठी आणि त्यानंतर 780 च्या पटीत अर्ज करणे आवश्यक आहे. आरव्हीएनएल सर्व प्रकारच्या रेल्वे प्रकल्पांना कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामध्ये रेल्वेचे नवीन रूळ टाकणे (नवीन मार्गांची निर्मिती), रेल्वे विद्युतीकरण, मेट्रो प्रकल्प, रेल्वेशी संबंधित मोठे पूल बांधणे, केबल बांधण्याचे पुल, रेल्वेशी संबंधित संस्थांच्या इमारती इत्यादींचा समावेश आहे. डिसेंबर 2018 पर्यंत आरव्हीएनएलकडे 77 हजार 504 कोटी रुपयांची ऑर्डर बुक होती.