अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालय येथे जाऊन पाण्याचे महत्व पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच टिळकनगर येथील झाडांवरील खिळे काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वेदना आम्हांला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगत खिळेमुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम राबवला. हा उपक्रम थोड्या काळापुरता मर्यादित नसून मुंबईतील विविध भागात तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे आवाहन खिळेमुक्त झाडं टीमचे मुंबई समन्वयक तुषार वारंग यांनी यावेळीं केले.
पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. टिळकनगर येथे आयोजित खिळेमुक्त झाडं अभियानात प्रामुख्याने साद फाउंडेशन आणि टाटा पावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. साद फाउंडेशनच्या वामन कांबळे, वंदना पवार, प्राजक्ता महामुनी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे ठाणे समन्वयक अविनाश पाटील यांनी यावेळीं सांगितले. मोहिमेत विधी गोलटकर, स्वप्नील शिरसाठ या युवकांनी अंघोळीची गोळी संकल्पना आणि खिळेमुक्त झाडं अभियानाची गरज उपस्थितांना समजावुन सांगितली. यावेळीं साद फाउंडेशनच्या वतीने सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी यांत आपले नाव नोंदवले. वृक्ष संवर्धनासाठी महानगरपालिकेला लवकरच पत्रव्यवहार केला जाईल असेही साद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळीं सांगितले.