लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने मोदी लाटेमुळे एकहाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसी आणि गुजरातच्या अहमदाबाद मधून निवडणूक लढवली होती. ते दोन्ही मतदारसंघातून बहुसंख्य मताने निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीचं चित्र जरा वेगळ आहे. देशात असंख्य प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत. पंतप्रधान मोदींनी दिलेली अनेक आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे जनमानसात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्याचा फटका या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला बसू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी जमेची बाजू म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवून पाकिस्तानचा ना’पाक’ दहशतवादी चेहरा संपूर्ण जगासमोर आणलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र यांची प्रतिमा जागतिक पातळीवर अधिक बळकट झाली आहे. येत्या निवडणुकीत भाजपाला याचा कितपत फायदा होईल हे २३ मे च्या निकालानंतरच कळेल.
दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकाच वेळी अमेठी आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतच्या रिंगणात उतरणार आहेत. यावर भाजपाकडून राहुल गांधींवर टिकास्त्र होताना दिसत आहेत. राहुल गांधी अमेठीतून हारण्याची भीतीने वायनाडमधून निवडणुकीत लढवत आहेत असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, केरळमधून निवडणूक लढवून राहुल गांधी दाक्षिणात्य राज्यात काँग्रेस राजकीयदृष्ट्या मजबूत करण्यासाठी निवडणुकीच्या निमित्ताने मैदानात आहेत असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे. कारण केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा तर राज्यसभेच्या ९ जागा आहेत. शिवाय ज्या वायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत त्या लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा येतात. केरळ हा लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचा बालेकिल्ला जरी असला तरी काँग्रेससाठी येथे पोषक वातावरण आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधून काँग्रेसचे ७ खासदार निवडून आले होते. ज्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी लढणार ते गेल्या काही वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या निवडणुकीत एम. आय शानवास वायनाडधून निवडून आले होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे राहुल गांधींना वायनाड येथून लढवून दक्षिण भारतात काँग्रेस मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्रयत्न करतांना दिसत आहे.
केरळ देशातील सर्वात साक्षर राज्य आहे. तेथील मतदार अधिक सूज्ञ आहेत. शिवाय केरळमधील कम्युनिस्ट विचारधारा ही देशातील कम्युनिस्ट विचारांच्या अग्रस्थानी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कम्युनिस्ट पक्षाचे भारतात प्रामुख्याने दोन विचारधारा आहेत. त्यात पश्चिम बंगाल येथील सीपीएम आणि केरळ येथील सीपीएम या दोन कम्युनिस्ट विचारधारेत खूपच फरक दिसून येतात. पश्चिम बंगालमध्ये सीपीएम ही पुरोगामी, समाजवादी, बुद्धीजीवी, समग्र मानव जमातीच्या कल्याणाची पुरस्कर्ता करणारी विचारधारा आहे. याउलट, केरळमध्ये कम्युनिस्ट असणे अर्थात क्रांतीकारी असण्याचे प्रतीक आहे. तेथे हिंसेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हिंसेच्या जोरावर काही सिद्ध करायचे असेल तर ते मागे हटत नाहीत. त्यामुळेच केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. मात्र, आता ब-यापैकी वैचारिक बदल याठिकाणी घडत आहे. त्यामुळे देशातील सेक्युलर शक्ती पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभिन्नता आहे. मात्र, याआधी युपीए सरकारमध्ये कम्युनिस्ट पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे देशात होणा-या लोकसभा निवडणुकीत सीपीएम काँग्रेस पक्षाला किती बळ देते? वायनाडच्या निवडणुकीतून काँग्रेस दक्षिण भारतात किती बळकट होईल हे पाहणे औचित्याचे ठरेल.
– रवी चव्हाण