डिजिटल व्यवहार करण्यात पुणे, चेन्नई, राजधानी दिल्लीचा परिसर आणि जयपूर ही शहरे देशात आघाडीवर असून, त्यातही पुणे हे अव्वल क्रमांकावर आहे. देशातील आघाडीची पेमेंट सोल्युशन कंपनी असलेल्या ‘रेझरपे’ने ‘दी इरा ऑफ रायझिंग फिनटेक‘ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला.
भारतात वेगाने वाढणार्या ‘फिनटेक इकोसिस्टम’चा अभ्यास यात केला आहे. या इकोसिस्टमचा लघु व माध्यम उद्योगांवर (एसएमई) होणार्या परिणामाचाही आढावा तसेच डिजिटल व्यवहारांच्या पद्धती, ऑनलाइन खर्च करण्याच्या लोकांच्या सवयी, ‘यूपीआय’चा प्रभाव याबाबत विश्लेषणही आहे.
सध्या मोठ्या व माध्यम शहरांमधील लघुउद्योगांमध्ये रोकडरहित व्यवहार करण्याचे प्रमाण 75 टक्क्यांनी वाढले आहे. नोटाबंदीनंतर व युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) यंत्रणा सादर झाल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठीची मागणी दरवर्षी 70 टक्क्यांनी वाढते आहे, असे पाहणीत आढळून आल्याची माहिती ‘रेझरपे’चे सहसंथपक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथुर यांनी दिली.