भारतातल्या ‘लोकसभा निवडणूक 2019’ याच्या वेळापत्रकानुसार 11 एप्रिल 2019 रोजी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 जागांसाठी मतदान होण्याचे नियोजित आहे. या मतदानाला सुरुवात करण्यासाठी म्हणून 5 एप्रिलला इंडो-तिबेटी सीमा पोलीस (ITBP) या भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असलेल्या ‘सेवा’ मतदारांकडून (service voters) अरुणाचल प्रदेशात मतदान केले गेले. लोहितपूर (अरुणाचल प्रदेश) गावातल्या ITBP तळाचे प्रमुख DIG सुधाकर नटराजन यांनी त्यांचे प्रथम मत दिले. 11 एप्रिलला सामान्य नागरिक मतदान करतील.
पहिल्याच टप्प्यात 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार, त्यामध्ये आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल, केरळ, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्किम, तेलंगणा, तामिळनाडू, अंदमान व निकोबार, दादरा व नगर हवेली, दमन व दीव, लक्षद्वीप, दिल्ली, पुडुचेरी, चंदीगड आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.
लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. वित्तविषयक प्रस्ताव हा येथे मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, ‘भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे’ हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेची कमाल सदस्य संख्या सध्या 552 एवढी आहे. यामधील 530 सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी तर 20 पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात, तर 2 सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये 5 वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो. प्रथम लोकसभा दिनांक 17 एप्रिल 1952 रोजी गठीत केली गेली. त्याची पहिली बैठक दिनांक 13 मे 1952 रोजी झाली.