भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, डिजिटल देयकांच्या बाबतीत होणार्या व्यवहारांमध्ये उपलब्ध असलेल्या ई-वॉलेट यासारख्या पर्यायी व्यासपीठांच्या तुलनेत युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) या पद्धतीचा वापर वाढलेला दिसून येत आहे.
UPI तंत्रावर आधारित असलेल्या व्यासपीठांच्या माध्यमातून मार्च 2019 मध्ये 1.35 लक्ष कोटी रुपयांचे व्यवहार झाले, जेव्हा की एप्रिल 2018 मध्ये याचे प्रमाण केवळ 27,000 कोटी रुपये एवढे होते. म्हणजेच केवळ एका वर्षाच्या कालावधीत यात 400% पेक्षा जास्त वाढ नोंदविली गेली. तर याच काळात ई-वॉलेटच्या माध्यमातून झालेल्या व्यवहाराच्या मूल्यामध्ये केवळ 210% एवढी वाढ झाली.
भारतात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आधारित देयके प्रणाली भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ (NPCI) अंतर्गत कार्य करते. भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ (NPCI) ही भारतातली सर्वप्रकारच्या किरकोळ देयके प्रणालीसाठीची एक छत्र-कंपनी आहे.