गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019 सालाच्या पहिल्या तिमाहीत जागतिक पातळीवर गोवर आजाराच्या प्रकरणांमध्ये 300% वाढ झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे. जगाच्या सर्व भागांमध्ये या आजाराचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी आतापर्यंत 170 देशांमध्ये गोवर आजाराच्या 112,163 प्रकरणांची नोंद झाली, जेव्हा की 2018 साली 163 देशांमध्ये 28,124 प्रकरणांची नोंद झाली होती.
याबाबतीत आफ्रिकेत सर्वाधिक वाढ पाहिली गेली आहे, ज्यानुसार केवळ एका वर्षाच्या काळात प्रकरणांमध्ये 700 टक्क्यांची वाढ झाली. गोवर आजार हवेच्या मार्गाने पसरतो आणि हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. हा आजार ‘पॅरामिक्झो’ नावाच्या विषाणूमुळे होतो.
या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. हा आजार प्राणघातक असू शकतो. प्रगत आरोग्यसेवा प्रणालीसह अनेक देशांमधून या आजाराचे उच्चाटन झाल्याची अधिकृत नोंद आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.
मिजल्स अँड रुबेला इनिशीएटिव्ह (MR&I) ही गोवर रोगासंबंधी समस्येला हाताळण्यासाठी सन 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ बालकोष (UNICEF), जागतिक आरोग्य संघटना (WHO), UN फाउंडेशन, अमेरिकन रेड क्रॉस आणि US सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी संयुक्तपणे स्थापित केलेली संस्था आहे.