अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालय येथे जाऊन पाण्याचे महत्व पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच कल्याण, ठाणे, अंधेरी शहरांतील झाडांवरील खिळे काढण्याचा सुत्य उपक्रम जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वेदना आम्हांला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगत खिळेमुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम राबवला. गेल्या वर्षभरापासुन हा उपक्रम मुंबईतील विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे ठाणे समन्वयक सागर वाळके यांनी यावेळीं केले.
पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे मुंबई समन्वयक तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले. कल्याण शहरांत मोहिमेत स्वप्नील शिरसाठ, भुषण राजेशिर्के, संकेत जाधव ठाणे शहरात म्युस फाऊंडेशनच्या प्रणव त्रिवेदी, सुशांक तोमर, पवित्रा श्रीवास्तव, जिनेश दोशी, संतोष आचार्य, प्रशांत राणे, शिरीष माळी, अलंकार परब तर अंधेरी येथे डॉ. गणेश कदम, प्रतिक्षा उमरस्कर, अनुजा दळवी, जानव्ही कांबळे, तेजस्वी मसने, नेहा डोईफोडे, सिद्दी धुरी, समसन दयाल, रोसमेरी डिसोझा या युवकांनी अंघोळीची गोळी संकल्पना आणि खिळेमुक्त झाडं अभियानाची गरज उपस्थितांना समजावुन सांगितली. वृक्ष संवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांसोबत आमचा पत्रव्यवहार चालु आहे अशी माहीती यावेळी खिळेमुक्त झाडं मोहिमेचे ठाणे समन्वयक अविनाश पाटील यांनी सांगितले. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे असेही ते यावेळी म्हणाले.