तब्बल आठ वर्षांहूनही अधिक काळानंतर, भारत 11 मे 2019 रोजी आरंभ होणार्या 58 व्या ‘व्हेनिस बिएनेल’ या भित्तीचित्र प्रदर्शनीत भाग घेणार आहे. या प्रदर्शनीत भाग घेण्याची भारताची ही दुसरीच वेळ आहे. यावर्षी ‘अवर टाइम फॉर फ्यूचर केअरिंग’ या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, 1938 साली महात्मा गांधींनी भारताचे आधुनिक कलाकार नंदलाल बोस यांना भारतीय जीवनाचे वेगवेगळे पैलू चित्रित करण्यासाठी सांगितले होते, जे गुजरातच्या हरिपूरा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्रात प्रदर्शित केले गेले. त्यातलीच 16 हरीपूरा भित्तीचित्रे (posters) या कार्यक्रमामध्ये भारत प्रदर्शनात मांडणार आहे.
प्रदर्शनीबाबत
‘व्हेनिस बिएनेल’ (किंवा आर्ट बिएनेल) ही भित्तीचित्रांची प्रदर्शनी जगातल्या सर्वात मोठ्या कला कार्यक्रमांपैकी एक आहे. हा कार्यक्रम व्हेनिस (इटली) येथे बिएनेल फाऊंडेशन या संस्थेकडून आयोजित केला जातो. ही प्रदर्शनी दर दोन वर्षांनी भरवली जाते. 1895 साली पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित केला गेला.