झाडे ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. झाडांना वैयक्तिक कारणांसाठी हानी पोचवणारे प्रत्येक कृत्य हे बेकायदेशीर म्हणून दखलपात्र आहे. झाडांवर खिळे ठोकून पोस्टर्स, बॅनर्स लावून जाहिरातीकरिता झाडांचा वापर करणे बेकायदेशीर तर आहेच शिवाय अनैतिक आहे यांसाठी अंघोळीची गोळी संस्था विविध शहरांत जनजागरण प्रत्यक्ष कृतीतून करत आहे. अंघोळीची गोळी संस्था महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांत ‘खिळेमुक्त झाडं’ ही मोहीम सातत्याने राबवत आहे. महाराष्ट्रभर चालणाऱ्या या मोहिमेत अनेक सामाजिक संस्था, युवकांचे गट आणि महाविद्यालय आजवर सामील झाले आहेत. झाडांवर ठोकले जाणारे पोस्टर, बॅनर आणि खिळे काढण्याचा प्रयत्न संस्था करत आहे त्याचबरोबर ‘आळेयुक्त झाडं’ ही मोहीम देखील संस्था राबवत आहे. पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने आणि विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांना एकत्र जोडण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने खिळेमुक्त झाडं ही मोहीम अनेक ठिकाणी राबवत आहोत. अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने नुकतेच आपले सरकार या पोर्टलवर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. यांत प्रत्येक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रांत अनेक वडाच्या झाडांना धागेदोरे बांधण्यात आले आहेत हे नमुद करण्यात आले आहे शिवाय या झाडांखाली देव- देवीच्या छोट्या- मोठ्या प्रतिमा, मुर्त्या, फोटो देखील लावलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी वडाच्या झाडांखाली पणत्या, मेणबत्या देखील लावण्यात येतात असे देखील सांगण्यात आले आहे. भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात झाडांना देखील संवेदना असतात हे स्पष्ट करून दाखवले आहे त्यामुळे नागरिकांची कळत नकळत होणारी कृती झाडांना हानीकारक ठरत असल्याचे संस्थेचे मुंबई जिल्हा समन्वयक तुषार वारंग यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील वडाचे प्रत्येक वृक्ष कसे सुरक्षित राहील यांची खबरदारी घेण्यात यावी यांसाठी पुजेसाठी वडाच्या फांद्या अनधिकृतपणे तोडणाऱ्या नागरिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी शिवाय वडाच्या झाडांना धागेदोरे बांधले जावू नयेत यांसाठी संबधित विभागाला सुचना देण्यात याव्यात आणि या संदर्भात परिपत्रके काढुन ही परिपत्रके ताबडतोब सार्वजनिक करण्यात यावीत असे देखील तक्रारीत नमुद केल्याचे खिळेमुक्त झाडं अभियानाचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील यांनी यावेळीं सांगितले. गेल्या पाच वर्षात भारतातील सव्वा लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे, त्यातंच वडाचे महत्व सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या वटपौर्णिमा म्हणजेच १६ जुन पुर्वी हे परिपत्रक काढावे ही मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. वडाच्या झाडाच्या संरक्षणासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक वडाच्या झाडावर करडी नजर ठेवावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी झाडांना होणार नाही यांसाठी संबंधित विभागाने पोलीस विभागाची मदत घ्यावी त्याचबरोबर शक्य असल्यास महानगरपालिकेच्या माध्यमाने पुजेसाठी महिलांना मोफत वडाच्या रोपट्यांचे वाटप देखील संबंधित विभागाला करता येवु शकते ही अभिनव संकल्पना देखील संस्थेने सुचवली आहे. आमच्या तक्रारीवर आश्वासक काम न झाल्यास संबंधित विभाग, कर्मचारी आणि इतर सर्व मंडळीवर झाडांविषयी असलेल्या विविध कायद्यांचे पालन न केल्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात येईल असेही संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे. नुकतेच १ मे महाराष्ट्रदिनी कल्याण शहरांत खिळेमुक्त झाडं अभियान घेण्यात आले होते अनेक वडाच्या झाडांची अत्यंत विदारक अवस्था बघुन ह्या तक्रारी नोंदवल्याचे अंघोळीची गोळी संस्थेचे ठाणे जिल्हा समन्वयक सागर वाळके यांनी सांगितले आहे.