देशातील लोकसभा निकालाचा एक्झिट पोल सर्व माध्यमातून दाखविण्यात येत आहेत. टिव्ही९ मराठीने त्यांच्या एक्झिट पोलच्या चर्चेसाठी वंचित बहुजन आगाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांना आमंत्रित केलं होतं. रविवारी रात्री ९ वाजता होणा-या ह्या चर्चासत्रासाठी जेव्हा टिव्ही९ मराठीच्या समन्वयकाने फोन लावला तेव्हा शेख यांचा आवाज पुरुषी असल्याचे कळाल्यानंतर आमच्या वृत्तवाहिनीला महिला प्रवक्या हव्या आहेत असे टिव्ही९ कडून सांगितले गेले. दरम्यान, शेख यांना एसएमएस द्वारे चर्चासत्राचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया सेलचे हेड निखिल बोर्डे यांनी दिली आहे.
दरम्यान, दिशा पिंकी शेख ह्या तृतियपंथी असल्यामुळे त्यांना मुद्दाम चर्चासत्रातून डावलण्यात आले. घडलेल्या प्रकाराबात वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी निषेध केला आहे. जोपर्यंत टिव्ही ९ यासंदर्भात माफी मागत नाही तोपर्यंत या वृत्तवाहिनीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सहभागी होणार नाहीत अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
“तृतियपंथीयांना सर्व ठिकाणी नागरिक म्हणून स्वीकार मिळण्यासाठी आम्ही अजून काय करायला हव? चॅनेलच्या चर्चासत्रातून लोकांची मानसिकता घडवू शकतात पण इथं या मोठ्या चॅनेलनं आपली बिभत्स असलेली मानसिकता दाखविली आहे. ह्या बाबी फक्त समन्वयकाच्या हातात नसतात तर याला संपादक आणि संपादकीय विभाग तेवढेच जबाबदार आहेत.”
– दिशा पिंकी शेख, प्रवक्त्या, वंबआ