आजच्या निकालांनी स्वतंत्र भारताच्या माथ्यावर गेल्या सत्तर वर्षांत थोपली गेलेली विकृत विचारांची जळमटे पार मुळासकट उपटून टाकली आहेत.
आजचा हा विजय ‘निर्णायक’ तर आहेच पण भारतीय राजकारणाच्या मुख्य धारेत खऱ्या ‘राष्ट्रवादी’ विचारांची मजबूत पायाभरणी करणाराही आहे. देशाच्या समग्र विकासाचे भान ठेऊन सामान्य माणसाला शासकीय योजनांच्या केंद्रस्थानी आणणारा आणि याच सामान्य माणसांच्या इच्छाशक्तीची वज्रमूठ आवळून दहशतवाद्यांवर निर्णायक प्रहार करणारा हा ‘राष्ट्रवाद’ आज विजयी झाला आहे.
याचे श्रेय निःसंशयपणे मोदी-शहांना आहे. पण त्या केवळ व्यक्ती नाहीत. गेली शंभर वर्षे उपेक्षा आणि अपप्रचाराचे हलाहल पचवूनही अनेक पिढ्यांनी ज्यासाठी आपले आयुष्य वेचले त्या ‘विचारांचे’ ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्या योजनांमागे, त्यांना कधीही भेटू न शकणाऱ्या आणि सत्तेच्या उतरंडीत तसूभरही जागा न मागणाऱ्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत. प्रामाणिक आणि क्षमतावान नेतृत्वाची राज्याराज्यातून आकाराला आलेली मोठी फळी हे या विचारधारेचे बलस्थान आहे.
माध्यमे आणि तथाकथित विचारवंतांना कधीही न दिसणारी समर्पित कार्यकर्त्यांची देशभर सर्वदूर पसरलेली सक्रियता,आपापल्या कार्यक्षेत्रात त्यांनी मिळवलेली समाजाची विश्वासार्हता आणि जातीपातीच्या संकुचित विचारांपासून समाजाला दूर करीत समान ‘राष्ट्रीय’ भावनेशी त्याला जोडण्याची त्यांची सिद्धता या तीन घटकांचाही आजच्या या विजयात निर्विवाद वाटा आहे.
हिंदुत्व म्हणजे हिंदुराष्ट्र असा निखालस खोटा प्रचार आज निकाली निघाला.
देशाची घटना बदलणारा नव्हे तर घटनेत अंतर्भूत केलेल्या समान नागरी कायद्यासह सर्वच मार्गदर्शक तत्वांना अंमलात आणू पाहणारा हा ‘राष्ट्रवाद’ आहे.
शतकानुशतकांच्या जखमा भरायला बराच मोठा कालावधी लागेल हे ओळखून मनापासून आरक्षणाचे समर्थन करणारा आणि वंचित समाजात आपल्या कामातून सौहार्दाचे जाळे विणणारा हाच विचार आहे.
जातीच्या गणितांना जमिनीवर उभ्या राहिलेल्या याच ‘समरसते’ने आज चीत केले आहे.
घराण्यांचा उद्दाम अहंकार, बुद्धीच्या जोरावर न्यायालयात अरेरावी करण्याचे प्रकार, बालिश आरोपांचा तद्दन खोटा प्रचार आणि सरतेशेवटी थेट निवडणूक आयोगावरच हेतुपुरस्सर प्रहार या सगळ्याच तंत्रांना या निकालांनी मोडीत काढले आहे.
मुठी आवळून ‘आजादी’ मागणाऱ्या जे.एन.यु.तल्या ‘कॉम्रेड्स’ना एका ठराविक गटाने डोक्यावर घेतले तरी त्यांच्या ‘आजादी’चा मतलब कळणाऱ्या जनतेने त्या ‘आजादी’सकट त्यांना आज घरी बसवले आहे.
हयातभर केवळ ‘लॉबिंग’ करून नावलौकीक मिळवलेले पत्रकार आणि विचारवंत प्रत्यक्षात किती खुजे आणि चिल्लर असतात हे आज इतरांना तर कळालेच पण अफवा आणि भीती पसरवणारी त्यांची विधाने वा लिखाण भारतातली तरुण पिढी कशी फाट्यावर मारते हे प्रत्यक्ष त्यांनाही चांगलेच समजले असेल.
मनुवाद,पोकळ देशभक्ती,युद्धज्वर, खोटा हवाई हल्ला,दलित व अल्पसंख्यांकांवर अत्याचार ,अशी सोयीची विचारधारा उभी करून त्या हवेवर निवडणूक जिंकण्याच्या बौद्धिक करामती आता चालणार नाहीत.
हा संदेश पुरेसा स्पष्ट आहे.
हिंदुत्व म्हणजे धर्माचे राजकारण नाही. सर्वांना आत्मीयतेने सामावून घेणाऱ्या संस्कृतीचे ते नांव आहे. म्हणूनच सर्वांच्या विकासाची आणि सर्वांना समान न्यायाची हमी त्यात अंतर्भूत आहेच.
हिंदुत्व म्हणजे दुर्बलता नाही, द्वेषही नाही आणि इतिहासात केलेल्या चुकांवर पांघरून घालणारी उद्दामताही नाही. देशाच्या संरक्षणासाठी ‘प्रखर प्रतिकार त्यात आहे आणि सामाजिक दोषांवरचे आत्मपरीक्षणातून आलेले उपायही त्याचाच एक भाग आहेत.
पत्रकारिता, साहित्य, चित्रपट या सारख्या बौद्धिक गटात ‘कळपा’ने राहून हिंदुत्व विचारधारेची हेटाळणी करणाऱ्यांना आज याच गटातील तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. मक्तेदारी संपल्याची खरी आग तिथेच लागली आहे.
‘पुरस्कार वापसी’पासून झालेले बुद्धिभ्रमाचे व अपप्रचाराचे एक चक्र गेल्या पाच वर्षांत फिरून आता सरतेशेवटी इ.व्ही.एम.वर येऊन आपटले आहे. ते कदाचित येथून पुढेही असेच फिरत राहील.
‘विकास’ आणि ‘विचार’ यांचे संतुलन राखणारा राजकारभार हेच या अपप्रचाराला खणखणीत उत्तर असणार आहे.
आजवर ज्या ‘विचारधारे’चा आपण केवळ तिरस्कारच केला तीच विचारधारा सतत विजयी होत आहे याचे कारण मशीनची हेराफेरी वा जुमलेबाजी नसून आपली ‘दांभिकता’ आणि सत्य स्वीकारण्यातील ‘अप्रामाणिकता’ आहे हे जोपर्यंत वैचारिक विरोध करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत जनतेचा हा कौल राष्ट्रवादी विचारांना असाच मिळत राहणार आहे !
– जयंत कुलकर्णी